खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त वैभववाडीत भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त वैभववाडीत भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

 

वैभववाडी

 

   माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या ७५ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून भाजपा कणकवली-देवगड-वैभववाडी विधानसभा मतदारसंघाच्या वतीने 'सिंधुनायक चषक २०२६' या राष्ट्रीय स्तरावरील भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा ५ ते ९ एप्रिल २०२६ या कालावधीत नाधवडे येथील श्री महादेव मंदिर मैदान येथे प्रकाशझोतात खेळवली जाणार आहे. आमदार नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू सहभागी होणार असून, संपूर्ण देशभरातील एकूण ६४ संघांचा यामध्ये समावेश असेल. सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्यातील क्रीडा प्रेमींसाठी ही स्पर्धा म्हणजे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा खेळ जवळून पाहण्याची एक मोठी संधी ठरणार आहे.या स्पर्धेचे उद्घाटन ५ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता होणार असून, स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा देखील अत्यंत भव्यदिव्य स्वरूपात पार पडणार आहे. स्पर्धेतील विजेत्या संघाला ५ लाख ७५ हजार ५७५ रुपये आणि द्वितीय क्रमांकास २ लाख ७५ हजार ५७५ रुपये तसेच आकर्षक चषक देऊन गौरविण्यात येईल. याव्यतिरिक्त उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक आणि सामनावीर यांनाही विशेष बक्षिसे दिली जाणार आहेत. प्रेक्षकांसाठी मैदानावर उत्तम आसन व्यवस्था, डीजे साऊंड सिस्टीम, लाईव्ह स्कोर आणि तज्ज्ञ समालोचनाची सोय करण्यात आली आहे. विशेष म्हणजे उपस्थित महिला व पुरुषांसाठी विशेष लकी ड्रॉ काढला जाणार असून त्यातूनही विविध बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राला मोठी चालना देणाऱ्या या स्पर्धेसाठी जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे, जिल्हा परिषद सदस्य मनोज रावराणे, वैभववाडी सभापती सिद्धेश रावराणे, माजी उपसभापती बंड्या मांजरेकर, भाजपा मंडल अध्यक्ष दिलीप तळेकर, मिलिंद मेस्त्री, सुधीर नकाशे यांसह अनेक मान्यवर आणि पदाधिकारी विशेष परिश्रम घेत आहेत. या ऐतिहासिक क्रिकेट स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी सर्व क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.