जिल्ह्यात बाटली किंवा कॅनमध्ये पेट्रोल-डिझेल देण्यावर बंदी
सिंधुदुर्गनगरी
जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असतानाही काही नागरिक आणि व्यावसायिक चुकीच्या पद्धतीने इंधनाची साठवणूक करत असल्याचे समोर आले आहे. ही बाब लक्षात घेऊन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी जिल्ह्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. पेट्रोल आणि डिझेल हे अतिशय ज्वलनशील पदार्थ असल्याने त्यांची निवासी भागात किंवा असुरक्षित साधनांमध्ये साठवणूक करणे सार्वजनिक सुरक्षिततेसाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे आता कोणत्याही पेट्रोल पंपावर बाटली, प्लास्टिक कॅन किंवा बॅरलमध्ये सुटे इंधन देण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.या नियमातून केवळ नोंदणीकृत मच्छिमार आणि त्यांच्या संस्थांना मासेमारी नौकांसाठी सूट देण्यात आली आहे. या व्यतिरिक्त कोणत्याही व्यक्तीने किंवा संस्थेने परवान्याशिवाय घरात, दुकानात किंवा गोदामात इंधनाचा साठा करू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे. जर कोणाकडे असा अवैध साठा आढळला, तर महसूल आणि पोलीस विभागामार्फत तो तातडीने जप्त केला जाईल. प्रशासनाच्या या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय न्याय संहिता आणि जीवनावश्यक वस्तू अधिनियमांतर्गत कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. हा आदेश २६ मार्च २०२६ पासून संपूर्ण जिल्ह्यात लागू झाला आहे.
konkansamwad 
