जिल्हा परिषद समिती सभापती पदी भाजपकडून प्रितेश राऊळ, अनुराधा नारकर यांना संधी

जिल्हा परिषद समिती सभापती पदी भाजपकडून प्रितेश राऊळ, अनुराधा नारकर यांना संधी

 

सिंधुदुर्गनगरी

 

    जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापती पदासाठी भाजपने आपल्या उमेदवारांची अधिकृत घोषणा केली आहे. जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी ओरोस येथे या नावांची घोषणा केली. त्यानुसार वेंगुर्ले तालुक्यातील रेडी जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडून आलेले प्रितेश राऊळ यांची शिक्षण व आरोग्य समिती सभापती पदासाठी निवड करण्यात आली आहे. तर देवगड तालुक्यातील फणसगाव मतदारसंघातून निवडून आलेल्या अनुराधा नारकर यांची महिला व बाल कल्याण समिती सभापती पदासाठी उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे.या महत्त्वाच्या निवडी जाहीर करताना भाजपचे गटनेते संजय बोबडी, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्यासह भाजपचे इतर जिल्हा परिषद सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्ह्यातील विकासकामांना गती देण्यासाठी आणि आरोग्य, शिक्षण तसेच महिला बालकल्याण विभागाच्या योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी या दोन्ही अभ्यासू लोकप्रतिनिधींना संधी देण्यात आली आहे.या निवडीमुळे वेंगुर्ले आणि देवगड तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, लवकरच या पदांचा अधिकृत पदभार स्वीकारण्याची प्रक्रिया पार पडणार आहे. जिल्हा परिषद प्रशासनावर पकड मजबूत करण्यासाठी भाजपने या निवडीतून प्रादेशिक समतोल साधण्याचा प्रयत्न केला असल्याचे दिसत आहे.