कुडाळची कन्या अर्शिन शेख ऑल इंडिया सोलो डान्स स्पर्धेच्या फायनलमध्ये
गोवा
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ पिंगुळीची कन्या कु. अर्शिन शेख हिने गोवा येथे आयोजित ऑल इंडिया सोलो डान्स स्पर्धेच्या फायनलमध्ये उत्कृष्ट नृत्याचे सादरीकरण केले. या स्पर्धेत भारतातील विविध ठिकाणांहून १५०० लोकांनी ऑडिशन दिले होते, आणि त्यामधून सेमीफायनलसाठी ६२५ जणांची निवड करण्यात आली होती.सेमीफायनल राऊंड गोवा येथे टीव्ही कोरिओग्राफर श्री. राजपूत यांच्या परीक्षणातून होऊन त्यांनी टॉप २५ डान्सरची निवड केली. त्यात अर्शिन ही टॉप २५ मध्ये येणारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव नृत्यांगना ठरली. फायनलमध्ये तिने सुप्रसिद्ध टीव्ही जज, कोरिओग्राफर अभिनेते धर्मेश यांच्यासमोर नृत्य करून वाहवा मिळवली.अर्शिनच्या यशामध्ये तिचे आईवडील, नृत्य दिग्दर्शक रवि कुडाळकर, निर्माते उमेश पाटील, सल्लागार सुनील भोगटे, चिमणी पाखरं डान्स अकॅडमी कुडाळचे सर्व नृत्यकलाकार यांचा मोलाचा वाटा आहे. या सर्वांच्या सहकार्याने आणि अर्शिनच्या नृत्याच्या आवडीनेच तिने ही कामगिरी केली आहे.

konkansamwad 
