मुंबईकरांनो सावधान! रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक
मुंबई
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील पायाभूत सुविधांचे सक्षमीकरण आणि तांत्रिक देखभालीसाठी येत्या रविवार, १२ एप्रिल २०२६ रोजी उपनगरीय मार्गावर मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत ब्लॉक असेल. या काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणाऱ्या आणि घाटकोपरकडून येणाऱ्या धिम्या मार्गावरील गाड्या विद्याविहार आणि सीएसएमटी दरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येतील. परिणामी, या लोकल माटुंगा, शीव, कुर्ला यांसारख्या प्रमुख स्थानकांवर थांबतील, मात्र मस्जिद, सँडहर्स्ट रोड, चिंचपोकळी आणि करी रोड या स्थानकांवर थांबणार नाहीत. हार्बर मार्गावरही प्रवाशांचे मोठे हाल होण्याची शक्यता आहे, कारण सीएसएमटी ते चुनाभट्टी आणि वांद्रे दरम्यान सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.४० वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात आला आहे. या काळात सीएसएमटी ते पनवेल, बेलापूर, वाशी तसेच वांद्रे आणि गोरेगाव कडे जाणारी व येणारी वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनातर्फे पनवेल ते कुर्ला दरम्यान विशेष गाड्या चालवण्यात येतील. तसेच, हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत मुख्य मार्ग आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची सवलत देण्यात आली आहे. देखभालीच्या कामामुळे लोकल फेऱ्या उशिराने धावणार असल्याने स्थानकांवर गर्दी होण्याची दाट शक्यता असून, प्रवाशांनी वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
konkansamwad 
