राज्याला अवकाळी पावसाचा इशारा

राज्याला अवकाळी पावसाचा इशारा

मुंबई 

 

  गत आठवडाभरा पासून उन्हाचे चटके सहन करणाऱ्या विदर्भासह अनेक जिल्ह्यांना तापमानात सरासरी चार अंश सेल्सिअसनी घट होऊन दिलासा मिळणार आहे. पण, ऐन रब्बी हंगामातील पिकांची काढणी सुरू असतानाच राज्यातील अनेक जिल्ह्यांत वादळी वारे, मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केला आहे. गुजरात आणि लगतच्या महाराष्ट्रावर वाऱ्याची प्रतिचक्रीय स्थिती तयार झाली होती. त्यामुळे गत आठवडाभर उष्णतेच्या लाटेचा तडाखा विदर्भाला बसला. विदर्भापासून दक्षिण मध्य महाराष्ट्रापर्यंत वाऱ्याची द्रोणीय स्थिती तयार झाल्यामुळे बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रावरून राज्याच्या दिशेने बाष्पयुक्त वारे येत आहेत. त्यामुळे ताशी ३० ते ४० किमी प्रति तास वेगाने वारे वाहून मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. आजपासून ते शुक्रवारपर्यंतच्या पाच दिवसांत कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात विजा, वारा-वावटळ, गडगडाटासह दुपारनंतर उष्णता संवहनी प्रक्रियेतून तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते. गुढी पाडव्याला, आदल्या व दुसऱ्या दिवशी म्हणजे दि.१८,१९,२० मार्च (बुधवार, गुरुवार, शुक्रवार) या तीन दिवशी मेघगर्जनेसह अमरावती, अकोला, वर्धा, बुलढाणा, वाशिम, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, बीड, धारशिव, लातूरसह मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर, सातारा, सांगली, सोलापूर या २० जिल्ह्यांत पावसाची शक्यता अधिक जाणवते. अमरावती अकोला वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या सहा जिल्ह्यात १८ मार्च रोजी किरकोळ गारपिटीची शक्यताही नाकारता येत नाही. मुंबईसह उत्तर कोकणातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी तसेच उत्तर मध्य महाराष्ट्रात जळगाव, नंदुरबार, धुळे, नाशिक, अहिल्यानगर, पुणे तसेच छत्रपती संभाजीनगर अशा तेरा जिल्ह्यांत काहीशी उष्णता व रात्रीच्या उकाड्याची शक्यता जाणवते.