आमदार निलेश राणे यांची पर्यटनमंत्र्यांसोबत बैठक.....सिंधुदुर्गच्या पर्यटन विकासाला गती देण्यावर भर

आमदार निलेश राणे यांची पर्यटनमंत्र्यांसोबत बैठक.....सिंधुदुर्गच्या पर्यटन विकासाला गती देण्यावर भर

मुंबई दि.१८

 

      कुडाळ-मालवण मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांनी आज मुंबई येथील 'मेघदूत' निवासस्थानी महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेतली. या महत्त्वपूर्ण बैठकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाबत सविस्तर चर्चा झाली. यावेळी माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांचीही प्रमुख उपस्थिती होती.सिंधुदुर्ग जिल्ह्याला लाभले विस्तीर्ण समुद्रकिनारे, ऐतिहासिक किल्ले, धार्मिक स्थळे, निसर्गरम्य पर्यटनस्थळे, जलक्रीडा तसेच समृद्ध कोकणी संस्कृती आणि खाद्यपरंपरा यामुळे जिल्ह्यात पर्यटनाची मोठी क्षमता आहे. या क्षमतेचा अधिक प्रभावीपणे वापर करून पर्यटनाला गती देण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर बैठकीत चर्चा करण्यात आली.पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेता, जिल्ह्यातील पर्यटनस्थळांपर्यंत पोहोचण्यासाठी वाहतूक सोयी अधिक सक्षम करणे, मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे आणि पायाभूत सुविधांचा नियोजनबद्ध विकास करण्यावर भर देण्यात आला.पर्यटन विकासाचा थेट फायदा स्थानिक अर्थव्यवस्थेला व्हावा यावर आमदार निलेश राणे यांनी विशेष भर दिला. पर्यटन वाढल्यास हॉटेल, होमस्टे, वाहतूक, हस्तकला आणि जलक्रीडा व्यवसायाला गती मिळेल. स्थानिक तरुण आणि उद्योजकांना मोठ्या प्रमाणात रोजगार व व्यवसायाच्या नव्या संधी उपलब्ध होतील, असे त्यांनी सांगितले.कुडाळ-मालवण मतदारसंघासह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनविषयक प्रलंबित प्रश्न आणि भविष्यातील नव्या प्रकल्पांबाबतही आमदार राणे यांनी पर्यटनमंत्र्यांचे लक्ष वेधले. जिल्ह्याच्या पर्यटन क्षमतेनुसार नवीन सुविधा व उपक्रम राबवण्यासाठी राज्य शासनाकडून पूर्ण सहकार्य मिळण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.देश-विदेशातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सिंधुदुर्गातील पर्यटनस्थळांचे प्रभावी ब्रँडिंग व प्रसिद्धी करणे, आधुनिक सुविधा निर्माण करणे आणि पर्यटकांसाठी सुरक्षित व दर्जेदार वातावरण तयार करण्याबाबतही बैठकीत सकारात्मक चर्चा झाली.