कारगिल विजय दिनानिमित्त माजी सैनिकांच्या सन्मानासाठी समाजाने पुढे यावे; राजू मसूरकर यांचे भावनिक आवाहन
सावंतवाडी
कारगिल विजय दिनानिमित्त सावंतवाडी येथे माजी सैनिक संघटनेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसूरकर यांनी माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या सन्मानासाठी समाजाने संवेदनशीलपणे पुढे येण्याचे आवाहन केले. आरपीडी हायस्कूल येथे झालेल्या या कार्यक्रमाला युवराज लखनराजे भोसले, माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष दीपक शिर्के, संजय सावंत, डॉ. प्रवीणकुमार ठाकरे, माजी सैनिक, वीरपत्नी, एनसीसी विद्यार्थी, आयुर्वेदिक महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि देशप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शहीद जवानांना पुष्पांजली अर्पण करण्यात आली तसेच कारगिल युद्धातील वीरपत्नींचा सन्मान करण्यात आला.यावेळी मनोगत व्यक्त करताना राजू मसूरकर म्हणाले की, देशाच्या रक्षणासाठी स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता सीमारेषेवर उभे राहणाऱ्या सैनिकांमुळेच आपण सुरक्षित जीवन जगत आहोत. त्यामुळे माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या अडचणी दूर करणे हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य आहे. गेली अनेक वर्षे आरोग्य क्षेत्रात कार्य करताना त्यांनी अनेक माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्यविषयक तसेच सामाजिक मदत केल्याचे सांगत, हे कार्य भविष्यातही सुरू राहणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.याच वेळी त्यांनी एक हृदयस्पर्शी अनुभव सांगितला. सावंतवाडी तालुक्यातील 1971 च्या भारत-पाक युद्धातील एका निवृत्त माजी सैनिकाचा मुलगा गोव्यातील राष्ट्रीय बँकेत व्यवस्थापक असूनही वडिलांपासून दूर गेला होता. पत्नीच्या निधनानंतर वृद्ध सैनिक एकटे राहत होते आणि घरातील वादामुळे पिता-पुत्रांमध्ये दुरावा निर्माण झाला होता. ही बाब समजताच राजू मसूरकर यांनी दोघांशी समुपदेशनात्मक संवाद साधला. पालकांनी मुलासाठी केलेल्या त्यागाची जाणीव करून देत तसेच कुटुंबातील नातेसंबंध टिकविण्याचे महत्त्व पटवून दिले. या संवादाचा सकारात्मक परिणाम होऊन आज संबंधित मुलगा पत्नी व मुलांसह नियमितपणे वडिलांची भेट घेत असून, मोबाईल व व्हिडिओ कॉलद्वारे त्यांची विचारपूसही करतो. त्यामुळे अनेक वर्षांचा दुरावा संपुष्टात आला असून कुटुंब पुन्हा एकत्र आले आहे.पुढे बोलताना मसूरकर म्हणाले की, समाजात अशा अनेक समस्या त्यांच्या निदर्शनास येतात आणि जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्या सोडविण्याचा सातत्याने प्रयत्न केला जात आहे. गेली 26 वर्षे ते आरोग्य क्षेत्रात गरीब-श्रीमंत, जात-पात, धर्म किंवा राजकीय विचार न पाहता प्रत्येक गरजू व्यक्तीला मार्गदर्शन व मदत करत असून, रुग्णसेवाच ईश्वरसेवा मानून शेवटच्या श्वासापर्यंत समाजसेवा करण्याचा आपला निर्धार कायम असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच वृद्ध आई-वडिलांच्या सेवेसाठी प्रत्येकाने जबाबदारी स्वीकारावी, त्यांच्या उत्तरायुष्यासाठी आर्थिक नियोजन करावे आणि संस्कार, संवाद व आपुलकीच्या माध्यमातून कुटुंबातील नाती जपावीत, असा भावनिक संदेशही त्यांनी उपस्थितांना दिला.
konkansamwad 
