दशावतार कलाकारांना मिळणार विशेष ओळखपत्र

मुंबई
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दशावतारी कलाकार आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी गेली अनेक वर्ष पाठपुरावा करत होते. परंतु या मागण्यांना यश आले नव्हते. याप्रश्नी कलाकारांनी आमदार निलेश राणे यांच्याकडे आपल्या व्यथा मांडल्या होत्या. त्यानुसार राणे यांनी गेल्या अधिवेशनात दशावतारी कलाकारांच्या विविध मागण्या बाबत सरकारचे लक्ष वेधले होते. दरम्यान त्यांच्या पुढाकाराने राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे दशावतारी कलाकारांच्या विविध प्रश्नांसंदर्भात विशेष बैठक संपन्न झाली.सिंधुदुर्ग आणि मुंबईतील सुमारे दोन हजारहून अधिक दशावतारी कलाकारांची शासन दरबारी अधिकृत नोंद व्हावी, त्याचप्रमाणे या कलाकारांसाठी देण्यात येणारी शासनाची मदत थेट कलाकारांच्या खात्यात जमा व्हावी, सांस्कृतिक मंत्रालयाच्या शिफारस समितीवर कलाकारांना समाविष्ट करून घ्यावे, तसेच वृद्ध कलावंतांना मिळणाऱ्या मानधनांमध्ये सुद्धा दशावतारी कलाकारांचा अधिकचा वाटा मिळावा यासाठी मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मागणी केली. मी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सुपुत्र असून माझ्या जिल्ह्यातील दशावतारी कलेला राजाश्रय मिळण्याबरोबरच कलाकारांना देखील न्याय मिळाला पाहिजे अशी आग्रहाची भूमिका घेत आमदार निलेश राणे यांनी केलेल्या मागण्यांबाबत सांस्कृतिक मंत्रालयाने ताबडतोब दखल घेऊन कलाकारांची जिल्हास्तरावर नोंदणी करून त्यांना ओळखपत्र देण्याचा पायलेट प्रोजेक्ट सिंधुदुर्ग पासून सुरुवात करण्याच्या सूचना अधिकारी वर्गाला दिल्या.त्याचप्रमाणे याबाबत शासन निर्णयामध्ये देखील सुधारणा करण्याचे निर्देश दिले. तसेच सांस्कृतिक मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली असणाऱ्या राज्यस्तरीय समितीमध्ये चार दशावतारी कलाकार व सदस्य यांची नेमणूक करण्याच्या सूचना देखील मंत्री आशिष शेलार यांनी दिल्या. त्यामुळे येणाऱ्या काळात दशावतारी कलेबरोबरच कलाकारांना देखील राजश्रय मिळण्याचा राजमार्ग अखेर खुला झाला आहे.या बैठकीसाठी दत्तमाऊली संस्था सचिव दत्तप्रसाद शेणई, पारंपारिक दशावतार कलाकार बहुउद्देशीय संघ सिंधुदुर्ग अध्यक्ष पुरुषोत्तम कोचरेकर, कला दिगदर्शक रुपेश नेवगी, दशावतार हितवर्धक नाट्य संस्था मुंबई अध्यक्ष आशिष कमलाकर गावडे, राजाराम धुरी, श्री देव बुटेश्वर दशावतार नाट्य मंडळ मुंबई सल्लागार विश्राम धुरी, शिवसेना नेते दादा साईल, देवेंद्र सामंत आदी उपस्थित होते.