स्वकमाईचा धडा शिकत विद्यार्थ्यांचा आकाशकंदील विक्री उपक्रम यशस्वी
परुळे
जिल्हा परिषद केंद्र शाळा नंबर ३ च्या विद्यार्थ्यांनी स्वकमाईचे धडे घेत स्वतः बनविलेले आकाशकंदील शुक्रवारीच्या आठवडा बाजारात विकून स्वकमाईचा आनंद लुटला. सगळीकडे दिवाळीचा उत्साहपूर्ण वातावरण आहे आणि दिवाळीची तयारी जोरात सुरू आहे. शाळेची सहामाही परीक्षा नुकतीच संपली असल्याने हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी खास आनंददायी ठरला.यावेळी कार्यानुभव विषयांतर्गत मुलांना आकाशकंदील बनविण्याचे शिक्षण देण्यात आले. विद्यार्थ्यांनी आकर्षक आणि रंगीत आकाशकंदील तयार केले आणि ते विक्रीसाठी बाजारात आणले. स्वतः विक्री करतानाही मुलांनी खूपच मजा केली आणि ग्राहकांशी संवाद साधला. बाजारहाटासाठी आलेल्या ग्रामस्थांनी या विद्यार्थी उपक्रमाचे जोरदार कौतुक केले आणि उत्स्फूर्तपणे कंदील विकत घेतले.हा उपक्रम केवळ स्वकमाई शिकवणारा नव्हे, तर मुलांमध्ये आत्मविश्वास आणि उद्योजकता वाढवणारा ठरला. शाळेच्या या कल्पनेने गावकऱ्यांमध्येही दिवाळीचा उत्साह वाढला आहे. अशा उपक्रमांमुळे शिक्षण अधिक रोचक आणि व्यावहारिक होत असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले.

konkansamwad 
