स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये आषाढी एकादशी उत्साहात साजरी

स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये आषाढी एकादशी उत्साहात साजरी

 

सावंतवाडी

 


      येथील स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये आषाढी एकादशीनिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात हा पवित्र सण साजरा करण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात सकाळच्या परिपाठाने झाली. या वेळी प्रशालेच्या सहाय्यक शिक्षिका सौ. चैताली वेर्लेकर यांनी विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीचे महत्त्व व वारकरी परंपरेची माहिती दिली. त्यानंतर इयत्ता पहिलीच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी टाळ-मृदंगाच्या गजरात "ज्ञानोबा-तुकाराम, विठ्ठल... विठ्ठल..." असा नामघोष करत सुंदर नृत्य सादर केले. रंगीबेरंगी वारकरी वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन टाकला. यामध्ये कु. चैतन्या कोरगावकर हिने रुक्मिणी, तर कु. समर्थ तेरेदेसाई याने भगवान विठ्ठलाची साकारलेली वेशभूषा सर्वांचे विशेष लक्ष वेधून घेणारी ठरली.त्यानंतर शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी एकत्र येत भावपूर्ण आरती केली. या निमित्ताने प्रशालेतील विद्यार्थ्यांनी भटवाडी येथील श्री विठ्ठल मंदिरात जाऊन "नाम घ्यावे आवडीने" हा अभंग सादर करत गायन सेवा अर्पण केली. विद्यार्थ्यांचे हे सुरेल आणि शिस्तबद्ध सादरीकरण उपस्थितांची मने जिंकून गेले. या अभंग गायनासाठी संगीत शिक्षिका सौ. ईश्वरी तेजम यांचे मार्गदर्शन लाभले, तर पखवाज शिक्षक संकेत म्हापणकर यांनी साथसंगत केली. कार्यक्रमाच्या शेवटी शाळेचे संस्थापक रुजुल पाटणकर व मुख्याध्यापिका सौ. प्राची साळगावकर यांनी विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाचे कौतुक केले. विद्यार्थ्यांना वारकरी परंपरेतील संस्कार, भक्तीभाव आणि भारतीय संस्कृतीची जपणूक करण्याचा संदेश देत त्यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. अशाप्रकारे भारतीय संस्कृतीची ओळख करून देणारा आणि विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या संस्कारांची रुजवण करणारा हा सोहळा अत्यंत जल्लोषात पार पडला.