वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळसच्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; ३४ महिला तलाठी व ग्रामसेविकांचा सहभाग
तुळस
सामाजिक, शैक्षणिक आणि वैचारिक उपक्रमांद्वारे सातत्याने समाजप्रबोधन करणाऱ्या वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस यांच्या वतीने आयोजित "ग्रामीण प्रशासनातील महिला शक्ती" या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेला राज्यभरातील महिला तलाठी व महिला ग्रामसेवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. महिलांच्या नेतृत्वगुणांना व ग्रामीण प्रशासनातील त्यांच्या मोलाच्या योगदानाला अभिव्यक्तीचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित या स्पर्धेसाठी एकूण ३४ निबंध प्राप्त झाले.वेताळ प्रतिष्ठान गेली अनेक वर्षे विविध विषयांवरील निबंध स्पर्धांद्वारे वैचारिक चळवळ उभी करत आहे.स्पर्धेतील निबंधांचे परीक्षण डॉ. सचिन परूळकर आणि डॉ. गोविंद धुरी यांनी केले. विषयाची सखोल मांडणी, वैचारिकता, आशय, भाषाशैली, सामाजिक भान आणि मौलिकता या निकषांवर आधारित विजेत्यांची निवड करण्यात आली.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे
प्रथम क्रमांक – संगीता चंद्रकांत पाटील (पियाळी, कणकवली)
द्वितीय क्रमांक – सायली सुनील सातोसे (अणुसूर, वेंगुर्ला)
तृतीय क्रमांक – अक्षता उत्तम पाटील (वांझोळे, रत्नागिरी)
उत्तेजनार्थ प्रथम :वर्षा अनंत नाडकर्णी (ओरस, सावंतवाडी)
उत्तेजनार्थ द्वितीय – अर्चना अनंत लाड (जानवली, कणकवली)
स्पर्धेतील निबंधांमधून महिला तलाठी व ग्रामसेविकांनी ग्रामीण प्रशासनातील आपल्या जबाबदाऱ्या, जनतेशी असलेले नाते, शासनाच्या योजना प्रभावीपणे राबविताना आलेले अनुभव, लोकाभिमुख प्रशासन, महिला नेतृत्व आणि ग्रामविकासातील आपले योगदान प्रभावी शब्दांत मांडले. ग्रामीण प्रशासनात महिला अधिकारी केवळ प्रशासकीय भूमिका निभावत नसून परिवर्तनाच्या प्रभावी शिल्पकार म्हणून कार्यरत असल्याचे या स्पर्धेतून अधोरेखित झाले.वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस हे समाजोपयोगी, शैक्षणिक, आरोग्य, रक्तदान आणि साहित्यविषयक विविध उपक्रम सातत्याने राबविणारी संस्था असून, समाजात सकारात्मक विचारांची चळवळ निर्माण करण्यासाठी अशा राज्यस्तरीय स्पर्धांचे नियमित आयोजन करत आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण प्रशासनात कार्यरत महिलांच्या कार्याला योग्य व्यासपीठ मिळाल्याची भावना सहभागी स्पर्धकांनी व्यक्त केली.
konkansamwad 
