महासूलचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांनी कुडाळात घेतला आढावा.
कुडाळ
महाराष्ट्र राज्याच्या महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांनी कुडाळ तहसील कार्यालय, प्रांत कार्यालय तसेच माणगाव परिसराला भेट देऊन विविध विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. शासकीय कामात पारदर्शकता आणि गतिशीलता आणणाऱ्या 'ई-ऑफिस' प्रणालीबाबत त्यांनी यावेळी विशेष माहिती घेत अधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण सूचना केल्या. राज्याच्या सर्वोच्च महसूल अधिकाऱ्यांनी थेट 'ग्राउंड झिरो'वर उतरून तपासणी केल्याने प्रशासकीय यंत्रणेची चांगलीच धावपळ उडाली. अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांनी कुडाळ येथील प्रांत कार्यालयासह तहसीलच्या विविध विभागांना भेटी दिल्या. यामध्ये प्रामुख्याने नोंदणी विभाग, संजय गांधी निराधार योजना शाखा, महसूल शाखा आणि अभिलेख कक्ष म्हणजेच रेकॉर्ड रूम येथील कामकाजाची त्यांनी कसून तपासणी केली. सर्वसामान्य नागरिकांची कामे वेळेत पूर्ण होण्याच्या दृष्टीने त्यांनी प्रलंबित प्रकरणांचाही आढावा घेतला. या दौऱ्याचे औचित्य साधून कुडाळ तहसील कार्यालयाच्या आवारात अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या हस्ते नारळाच्या झाडाचे रोपण करण्यात आले. त्यानंतर विकास खारगे यांनी माणगावचा दौरा केला. त्यांनी माणगाव मंडळ अधिकारी कार्यालय, तलाठी ऑफिस आणि माणगाव ग्रामपंचायतीला भेट दिली. ग्रामपंचायतीला भेट दिली असता सरपंच मनिषा भोसले यांनी अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आलेल्या विविध विकासकामांची आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती त्यांनी घेतली. माणगाव ग्रामपंचायतीचा कारभार पाहून विकास खारगे यांनी त्यांच्या कामकाजाचे विशेष कौतुक केले. तसेच, ग्रामपंचायत इमारतीमध्ये असलेल्या 'सेतू सुविधा केंद्रा'ला भेट देत नागरिकांना दाखले व इतर सेवा कशा प्रकारे मिळतात, याची त्यांनी परिपूर्ण माहिती घेतली व आवश्यक सूचना सुद्धा दिल्या. तत्पूर्वी सकाळच्या सत्रात त्यांनी माणगाव तळीगावं येथील रस्त्याची पाहणी करून सद्यस्थिती जाणून घेतली. दौऱ्यादरम्यान विकास खारगे यांनी माणगाव येथील प्रसिद्ध दत्त मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले. याप्रसंगी 'माणगांव दत्त मंदिर ट्रस्ट'च्या वतीने शाल व श्रीफळ देऊन त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. राज्याच्या महसूल सचिवांच्या या दौऱ्यात सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमीसे, कुडाळच्या प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुसे, कुडाळचे तहसीलदार सचिन पाटील तसेच नायब तहसीलदार अमरसिंह जाधव यांच्यासह महसूल व ग्रामविकास विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच याप्रसंगी पंचायत समिती सदस्य योगेश धुरी, उपसरपंच बापू बागवे, ग्रामविकास अधिकारी वैभव सावंत, मंडळ अधिकारी आर.बी. कदम, माणगाव तलाठी सुशांत पाटील, अश्विनी दराडे आदी मान्यवर उपस्थित होते.
konkansamwad 
