कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकरकडून रेवंडकर कुटुंबियांना मदतीचा हात...

कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकरकडून रेवंडकर कुटुंबियांना मदतीचा हात...

मालवण

 

        गोरगरीब आणि गरजूंच्या मदतीसाठी नेहमीच अग्रेसर राहणाऱ्या कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर हिने पुन्हा एकदा संवेदनशीलतेचे दर्शन घडवले आहे. शहरातील दांडी मोरेश्वर वाडी येथील रहिवासी रविना रवींद्र रेवंडकर यांच्या आजारपणाची आणि कुटुंबाच्या आर्थिक अडचणीची दखल घेत अंकिता वालावलकर हिने १० हजार रुपयांचा मदतनिधी धनादेशाद्वारे रेवंडकर कुटुंबाकडे सुपूर्द केला आहे. रविना रवींद्र रेवंडकर यांच्या पोटात २४४२५ एमएम चा ट्यूमर असून, त्यांच्या फुफ्फुसातही पाणी झाले आहे. त्यांच्यावर सध्या कणकवली येथील डॉ.बिरमोळे यांच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रवींद्र रेवंडकर हे स्वतः मोलमजुरी करून कुटुंबाचा गाडा चालवतात. मात्र, पत्नीच्या या गंभीर आजारपणामुळे आणि शस्त्रक्रियेसाठी येणारा अफाट खर्च पाहता हे कुटुंब मोठ्या आर्थिक विवंचनेत सापडले होते. या कठीण परिस्थितीची माहिती मिळताच अंकिता वालावलकर हिने रेवंडकर कुटुंबाला धीर दिला. प्राथमिक उपचार आणि औषधोपचारासाठी तिने १० हजार रुपयांची आर्थिक मदत सौ. रेवंडकर यांचे पती रवींद्र रेवंडकर यांच्याकडे सुपूर्द केली. अंकिताने दाखवलेल्या या दातृत्वाबद्दल रेवंडकर कुटुंबियांनी व स्थानिक नागरिकांनी तिचे मनापासून आभार मानले आहेत. रविना रेवंडकर यांच्या आगामी शस्त्रक्रियेसाठी आणि पुढील उपचारांसाठी मोठ्या रकमेची आवश्यकता आहे. रवींद्र रेवंडकर यांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने, दानशूर व्यक्ती आणि सामाजिक संस्थांनी त्यांना जमेल तशी आर्थिक मदत करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.