रेल्वेची धडक बसून नाधवडे येथील तरुणाचा मृत्यू

रेल्वेची धडक बसून नाधवडे येथील तरुणाचा मृत्यू

वैभववाडी

 

      वैभववाडी रेल्वे स्थानकापासून खारेपाटणच्या देशाने सुमारे दोन किलोमीटर अंतरावर इसार एक्सप्रेसची धडक बसून एका ३६ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. अमोल प्रकाश खांडेकर (वय ३६, मूळ रा. नाधवडे हेळकरवाडी, सध्या रा. मुंबई) असे मृत तरुणाचे नाव आहे. ड्युटीवर असताना खारेपाटण स्टेशन मास्तर यांनी कोकण रेल्वे मार्गावर अपघात झाल्याची माहिती रेल्वे पोलिसांना दिली. माहिती मिळताच रेल्वे पोलीस प्रवीण राजाराम मोरे (वय ४७) आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली. तिथे रेल्वे ट्रॅकवर एका अज्ञाताचा मृतदेह आढळून आला. रेल्वे पोलिसांनी तातडीने या घटनेची माहिती वैभववाडी पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच वैभववाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर, पोलीस कर्मचारी उद्धव साबळे व धनाजी धडे यांनी तात्काळ घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला. मृतदेहापासून काही अंतरावर पोलिसांना एक मोबाईल सापडला. या मोबाईलच्या आधारे पोलिसांनी चौकशी केली असता, संबंधित मृत व्यक्ती ही अमोल खांडेकर असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी अमोल यांच्या मेहुण्यांशी संपर्क साधून मृतदेहाचे छायाचित्र पाठवले असता, त्यांनी अमोल यांची ओळख पटवली. याप्रकरणी रेल्वे पोलीस प्रवीण मोरे यांनी वैभववाडी पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दिली असून अमोल खांडेकर यांचा मृतदेह पुढील शवविच्छेदनासाठी वैभववाडी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या घटनेमुळे नाधवडे आणि हेळकरवाडी परिसरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.