कणकवली बाजारपेठेत मध्यरात्री भीषण आग
कणकवली
शहरातील बाजारपेठेत रविवारी मध्यरात्री १२ वा. च्या सुमारास नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या घराशेजारी असलेल्या महाडिक लेडीज टेलर या दुकानाला अचानक आग लागल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आगीची माहिती मिळताच स्थानिक युवक आणि नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आग विझविण्याचे प्रयत्न केले. दुकानातून निघणारे धुराचे लोट छतापर्यंत पसरत होते. बाजारपेठेतील गर्दीची जागा आणि आजूबाजूला इतर दुकाने असल्याने मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र युवक, स्थानिक नागरिक आणि प्रशासनाच्या तत्परतेमुळे आग नियंत्रणात आणण्यात यश आले.दरम्यान, आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज स्थानिक नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. सध्या मे महिन्यातील हंगामामुळे दुकानात मोठ्या प्रमाणात ड्रेस, साड्या, दप्तर, छत्र्या, रेनकोट तसेच शिलाई साहित्य विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. आगीत हे सर्व साहित्य जळून खाक झाले. याशिवाय फर्निचर, वायरिंग, इंटेरियर आणि अन्य साहित्याचेही मोठे नुकसान झाले असून दुकान मालक प्रसाद महाडिक यांच्या कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.
konkansamwad 
