विरोधक आणि सत्ताधारी यांच्यातील वादामुळे विकासकामे ठप्प....ठाकरे युवा सेनेचा आरोप

विरोधक आणि सत्ताधारी यांच्यातील वादामुळे विकासकामे ठप्प....ठाकरे युवा सेनेचा आरोप

सावंतवाडी

 

     सावंतवाडी नगरपरिषदेतील सत्ताधारी व विरोधक यांच्यातील वाद आणि सत्ताधाऱ्यांमधील गटबाजीमुळे खासकीलवाडा व न्यू खासकीलवाडा येथील विकासकामे ठप्प पडल्याचा गंभीर आरोप ठाकरे युवा सेनेचे तालुकाप्रमुख आशिष सुभेदार यांनी केला आहे.या भागातील कामांची टेंडर प्रक्रिया पूर्ण होऊन ठेकेदारांना वर्क ऑर्डरही देण्यात आली आहे. मात्र, ठेकेदारांशी संपर्क साधला असता नगरपरिषदेतूनच कामे सुरू करू नका, अशा सूचना मिळाल्याचे समोर आले आहे. खासकीलवाडा व न्यू खासकीलवाडा येथील सत्ताधारी व विरोधी नगरसेवक निष्क्रिय असल्यामुळे हा प्रकार घडत असल्याचा आरोप सुभेदार यांनी केला. जिल्ह्याचे नेतृत्व करणारे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख याच भागातील नगरसेवक आहेत. मात्र, जिल्ह्याचे नेतृत्व करताना त्यांचे स्वतःच्या प्रभागाकडे पूर्णतः दुर्लक्ष होत असून त्यांनी वॉर्डमधील मतदारांना वाऱ्यावर सोडल्याचे दिसत आहे, असा घणाघात सुभेदार यांनी केला.खासकीलवाडा शिल्पग्राम तिठा परिसरात राजरोसपणे दुर्गंधी पसरली आहे. वारंवार नगरपरिषदेला कळवूनही केवळ तात्पुरती उपाययोजना केली जाते आणि काही दिवसांत 'जैसे थे' परिस्थिती होते. स्ट्रीट लाईट, विद्युत खांब, झाडे-झुडपे, पाणी प्रश्न, गटार समस्या, रस्त्यावरील खड्डे अशा विविध प्रश्नांकडे निवडून दिलेल्या नगरसेवकांचे पूर्णतः दुर्लक्ष होत असल्याचे सुभेदार म्हणाले.पुढील काही दिवसांत पावसाळा सुरू होणार आहे. गटारांची कामे अपूर्ण राहिल्यास रहिवाशांच्या घरांमध्ये पाणी घुसण्याची व पाणी तुंबून त्रास होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे येत्या चार दिवसांत सदरची कामे सुरू न झाल्यास येथील रहिवाशांना सोबत घेऊन मुख्याधिकाऱ्यांना घेराव घालण्यात येईल, असा इशारा रहिवाशांच्या वतीने देण्यात आला आहे."वेळ मिळाल्यास नगरसेवकांनी आपल्या मतदारसंघात फिरावे. येथील नागरिक निश्चितच त्यांच्या समस्या दाखवतील व त्याचे निवारण करावे," असे आवाहन ठाकरे गटाचे युवासेना तालुकाप्रमुख आशिष सुभेदार तथा शहर प्रवक्ते यांनी केले आहे.