विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हाच खरा पुरस्कार - सभापती हर्षदा वाळके

विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हाच खरा पुरस्कार - सभापती हर्षदा वाळके

कणकवली

      प्राण जीवन संयोग संस्था व जनसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू असलेल्या वह्या वाटपाच्या उपक्रमात मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद दिसत आहे. मुलांची प्रगती आणि सर्वांगीण विकासासाठी हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी तो महत्त्वाचा ठरेल, असे प्रतिपादन कणकवली पंचायत समितीच्या सभापती हर्षदा वाळके यांनी केले.प्राण जीवन संयोग संस्थेचे अध्यक्ष संदीप चौकेकर यांच्या सहकार्याने आणि शिवशक्ती मल्टिस्पेशालिटी सर्व्हिसेस संचलित जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष भगवान लोके यांच्या पुढाकाराने नांदगाव पंचक्रोशीतील प्राथमिक शाळांमध्ये मोफत वह्या वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ सभापती हर्षदा वाळके यांच्या हस्ते करण्यात आला.या उपक्रमांतर्गत पूर्ण प्राथमिक शाळा नांदगाव-असलदे, नांदगाव शाळा क्रमांक 1 आणि नांदगाव उर्दू शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले.यावेळी बोलताना हर्षदा वाळके म्हणाल्या, पत्रकार भगवान लोके हे आपल्या लाल मातीबद्दल आत्मीयता जपत परिसरातील गावांना न्याय देण्याची भूमिका घेत आहेत. त्यांच्यामुळे गावात एकजूट निर्माण झाली आहे. असलदे गावाने दारूबंदी आणि जमीन विक्री बंदी करून इतर गावांसमोर आदर्श ठेवला आहे, हे कौतुकास्पद आहे.नांदगावचे सरपंच रविराज उर्फ भाई मोरजकर म्हणाले, हा स्तुत्य उपक्रम असून विद्यार्थ्यांनी भविष्यात यशस्वी होऊन गावाबद्दल आत्मीयता ठेवावी.यावेळी भगवान लोके म्हणाले, ज्या लाल मातीत जन्म घेतला त्या मातीचे ऋण फेडण्याचा हा छोटा प्रयत्न आहे. संदीप चौकेकर यांनी चांगल्या दर्जाच्या वह्या उपलब्ध करून दिल्या आहेत. असलदे गावाने दाखवलेली एकजूट हेच आमचे बळ आहे.या कार्यक्रमाला नांदगाव सरपंच भाई मोरजकर, असलदे सरपंच चंद्रकांत डामरे, उपसरपंच सचिन परब, इरफान साटविलकर, निरज मोरये, दयानंद हडकर, प्रमोद लोके, बाबाजी शिंदे, परशुराम परब, सुनीता लोके यांच्यासह ग्रामस्थ, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.