वेगाने येणारी दुचाकी बसखाली...कणकवली बसस्थानकासमोरील घटना
कणकवली
बसस्थानकासमोरील मिडलकट वरून तळेरे ते कणकवली या दिशेने जाणारी बस वळली. त्याच दरम्यान वेगाने येणारी दुचाकी बसखाली गेली. सुदैवाने दुचाकीस्वाराने उडी मारल्याने तो बचावला. कणकवली बसस्थानकासमोरील उड्डाणपुलाखाली ही घटना घडली. यात दुचाकीस्वार आणि एस.टी. बस चालक या दोहोंचाही बेजबाबदारपणा समोर आला.एक दुचाकीस्वार मुंबई ते गोवा या दिशेने जात होता. त्याच्या मागाहून त्याच दिशेने कणकवली बसस्थानकात एस.टी. बस जात होती. बस स्थानकासमोरील मिडलकटवरून ही बस वळत असल्याचे दुचाकीस्वाराच्या लक्षात आले नाही. आपल्या मागून दुचाकीस्वार येत आहे हे बस चालकाने पाहिले नाही. बस चालकाने बसस्थानकाच्या दिशेने बस वळवली. तर दुचाकीस्वार आपल्याच धुंदीत दुचाकी पुढे घेऊन चालला होता. अचानक बस वळल्याचे लक्षात येताच त्याने दुचाकी सोडून उडी मारली. यात दुचाकी थेट एस.टी. बसखाली गेली.या अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. एस.टी.च्या अधिकाऱ्यांनीही तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलीस ठाण्याचे हवालदार विनोद चव्हाण, वाहतूक पोलीस संदेश अबिटकर देखील घटनास्थळी दाखल झाले होते. अपघातानंतर काही वेळाने दुचाकी बसच्या खालून बाहेर काढण्यात आली.
konkansamwad 
