मृगाच्या पावसाची प्रतीक्षा.....खरीप तयारी अंतिम टप्प्यात, मात्र महागाईने शेतकरी चिंतेत !
सिंधुदुर्ग
मान्सूनच्या आगमनाची चाहूल लागताच शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागले आहेत. पेरणीपूर्व मशागतीची बहुतांश कामे अंतिम टप्प्यात पोहोचली असून शेतकरी आता पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. यंदा हवामान विभागाने समाधानकारक पावसाचा अंदाज व्यक्त केल्याने शेतकऱ्यांमध्ये आशावादाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे बियाणे व खतांच्या खरेदीलाही वेग आला आहे. मृग नक्षत्रात चांगला पाऊस झाल्यानंतरच पेरणीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होईल, असे अनुभवी शेतकरी सांगत आहेत.मात्र दुसरीकडे वाढत्या महागाईमुळे बळीराजा अडचणीत सापडला आहे. खतांच्या वाढलेल्या किमती, शेतीमालाला मिळणारा अपुरा दर आणि कर्जमाफीबाबतच्या नाराजीमुळे आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांवर आता पेट्रोल-डिझेल दरवाढीचे ओझे पडले आहे. ट्रॅक्टर, पंपसेट, नांगरणी, वखरणी, हार्वेस्टर तसेच मजूर वाहतुकीसाठी लागणाऱ्या डिझेलच्या वाढलेल्या किमतींमुळे शेतीचा खर्च लक्षणीय वाढला आहे.बैलजोडी व शेतीची अवजारेही महाग झाल्याने अनेक शेतकऱ्यांसमोर आर्थिक अडचणी उभ्या राहिल्या आहेत. या महागाईचा फटका ग्रामीण भागातील तरुणांनाही बसत आहे. शेतीमाल बाजारात नेणे, शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी प्रवास करणे अधिक खर्चिक बनले आहे. त्यामुळे वाढत्या महागाईबाबत ग्रामीण भागात नाराजी व्यक्त होत आहे.दरम्यान, खरीप हंगामासाठी आवश्यक खते व बियाण्यांचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्यात आल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे. शेतकऱ्यांना कोणतीही कमतरता भासणार नसल्याचा दावा करण्यात आला असला, तरी बाजारात मागणी असलेल्या काही बियाणे आणि खतांचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पावसासह कृषी साहित्याच्या उपलब्धतेकडेही शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
konkansamwad 
