देवगड येथे समुद्रात बेपत्ता झालेल्या चैतन्यचा मृतदेह सापडला
देवगड
देवगड तालुक्यातील तारामुंबरी-बागवाडी समुद्रात पोहताना बेपत्ता झालेल्या चैतन्य राजाराम गुरव या युवकाचा मृतदेह तब्बल २४ तासांच्या अथक शोधमोहीमेनंतर आज सायंकाळी मिठमुंबरी बौद्धवाडी येथील कांदळवन क्षेत्रात आढळून आला.या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण देवगड परिसरात आणि त्याच्या मित्रपरिवारात प्रचंड हळहळ व्यक्त होत आहे.मुंबईतील दादर-नायगाव येथील पाच मित्रांचा ग्रुप देवगड परिसरात पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आला होता. काल सायंकाळी पाचच्या सुमारास हे सर्व मित्र मिठमुंबरी-बागवाडी समुद्रकिनाऱ्यावर गेले. त्यातील चार जण समुद्राच्या पाण्यात पोहण्यासाठी उतरले, मात्र पाण्याचा आणि लाटांच्या वेगाचा अंदाज न आल्याने चौघेही अचानक गटांगळ्या खाऊ लागले आणि बुडू लागले. त्यांनी जिवाच्या आकांताने केलेल्या आरडा ओरडीनंतर स्थानिक ग्रामस्थांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे तिघा जणांना सुखरूप पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले, मात्र चैतन्य हा लाटांच्या प्रवाहासोबत समुद्रात बेपत्ता झाला होता. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाने युद्धपातळीवर शोधमोहीम हाती घेतली. आज सकाळी आठ वाजल्यापासून मत्स्य विभागाच्या माध्यमातून थेट ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करून संपूर्ण समुद्र परिसरात चैतन्यचा शोध घेतला जात होता. दिवसभर स्थानिक प्रशासन, मच्छीमार आणि जीवरक्षक प्रयत्नांची पराकाष्ठा करत होते, तरीही सायंकाळी पाच वाजेपर्यंत त्याचा कुठेही पत्ता लागला नव्हता. शेवटी सायंकाळी पाचनंतर मिठमुंबरी-बौद्धवाडी येथील कांदळवन क्षेत्रात कांदळवन सफारीसाठी गेलेल्या काही पर्यटकांना आणि स्थानिक मच्छीमारांना पाण्यात एक मृतदेह तरंगताना दिसला. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता स्थानिक नागरिक लक्ष्मण तारी आणि पोलीस पाटलांशी संपर्क साधला. त्यानंतर स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने होडी घेऊन जात हा मृतदेह किनाऱ्यावर आणण्यात आला. तिथे उपस्थित असलेल्या चैतन्यच्या वडिलांनी अत्यंत जड अंतःकरणाने आपल्या एकुलत्या एक मुलाची ओळख पटवली. यानंतर प्रशासनाने मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णवाहिकेतून देवगड ग्रामीण रुग्णालयात पाठवला. या प्रसंगी तहसीलदार रमेश पवार, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, रवींद्र महाले, आशिष कदम, संतोष भालेराव, ग्रामसेवक रेश्मा गोळवणकर, रमेश तारी, दयानंद मुंबरकर, हेमंत तोडणकर, कदम नाईक, सुजित नाईक यांच्यासह स्थानिक पोलीस कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
konkansamwad 
