परप्रांतीयांना जमीन विक्री करण्यास बंदी...असलदे ग्रामस्थांचा बैठकीत निर्णय

परप्रांतीयांना जमीन विक्री करण्यास बंदी...असलदे ग्रामस्थांचा  बैठकीत निर्णय

 कणकवली

 

     कणकवली तालुक्यातील असलदे गावात ग्रामस्थांनी एक ऐतिहासिक निर्णय घेत परप्रांतीयांना जमीन विक्री करण्यास बंदी घातली आहे. दोडामार्ग तालुक्यातील कोलझर गावाच्या पावलावर पाऊल ठेवत असलदे येथील श्री देव रामेश्वर पावणाई चव्हाटा मंदिरात झालेल्या गाव सभेत हा एकमुखी ठराव मंजूर करण्यात आला. गावाचा एकोपा, संस्कृती आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. बाहेरील राज्यातील गुंतवणूकदार आणि उद्योजक मोठ्या प्रमाणावर जमिनी खरेदी करत असल्यामुळे भविष्यात स्थानिक भूमिपुत्र विस्थापित होण्याची भीती निर्माण झाली आहे. अशा व्यवहारामुळे गावातील पारंपरिक सण-उत्सव, हिंदू धर्मातील रूढी-परंपरा आणि नैसर्गिक साधनसंपत्तीला बाधा येऊ शकते, असा सूर या सभेत उमटला. शेतकऱ्यांनी आपल्या आंबा-काजू बागायती टिकवून ठेवाव्यात आणि आपली उपजीविका धोक्यात आणू नये, यावर यावेळी सविस्तर चर्चा झाली. या सभेत झालेल्या ठरावानुसार, इथून पुढे जमिनीची विक्री करायची असल्यास ती प्रथम भावकीला, त्यानंतर वाडीतील शेजाऱ्याला किंवा गावातील व्यक्तीलाच प्राधान्य देऊन करावी, असे निश्चित करण्यात आले आहे. सरपंच चंद्रकांत डामरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला गावातील लोकप्रतिनिधी, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या संस्कृतीची ओळख जपण्यासाठी असलदे गावाने उचललेले हे पाऊल जिल्ह्याभरात चर्चेचा विषय ठरत आहे.