वेंगुर्ला येथील बेपत्ता मच्छिमाराचा मृतदेह वायंगणी किनाऱ्यावर सापडला

वेंगुर्ला येथील बेपत्ता मच्छिमाराचा मृतदेह वायंगणी किनाऱ्यावर सापडला

वेंगुर्ला

 

     अचानक आलेल्या वादळीवाऱ्यामुळे मच्छिमारी  बोट बुडून बेपत्ता झालेले शिरोडा-केरवाडी येथील मच्छिमार राजन राघोबा सारंग (वय ४८) यांचा मृतदेह आज, मंगळवारी सकाळी वायंगणी-पोयंडीवाडी किनाऱ्यावर आढळून आला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे शिरोडा आणि संपूर्ण वेंगुर्ला किनारपट्टी भागात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.रविवार २४ मे ला पहाटेच्या सुमारास शिरोडा केरवाडी येथून एक मच्छिमारी बोट समुद्रात मासेमारीसाठी गेली होती. मात्र, अचानक आलेल्या वेगवान वादळीवाऱ्यामुळे आणि समुद्रातील खवळलेल्या लाटांमुळे ही बोट खोल समुद्रात उलटली. या बोटीवरील अन्य दोन मच्छीमारांना तातडीने इतर सहकारी मच्छिमारांच्या मदतीने सुखरूप वाचवण्यात यश आले होते, मात्र राजन सारंग हे खोल समुद्रात वाहून गेल्याने बेपत्ता झाले होते.घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि तटरक्षक दलाच्या वतीने रविवारी आणि सोमवारी सायंकाळी उशिरापर्यंत समुद्रात मोठी शोधमोहीम राबविण्यात आली होती. स्थानिक मच्छिमारही आपल्या पातळीवर शोध घेत होते. दरम्यान, आज मंगळवारी सकाळी वायंगणी पोयंडीवाडी येथील किनारपट्टीवर एक मृतदेह नागरिकांना वाहून आल्याचे दिसून आले. त्याची ओळख पटवली असता, तो बेपत्ता मच्छिमार राजन सारंग यांचाच असल्याचे निष्पन्न झाले. याबाबतची माहिती मिळताच वेंगुर्ला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्यासह पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा केला आहे. सध्या पोलीस प्रशासनाकडून पुढील कायदेशीर व वैद्यकीय कार्यवाही सुरू आहे.