महिला दिनानिमित्त वेंगुर्ला तालुक्यातील १० कर्तृत्वान महिलांचा सन्मान

वेंगुर्ला
महिला दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी आणि कोकण कला व शिक्षण विकास संस्था यांच्या तर्फे भाजप कार्यालय वेंगुर्ले येथे तालुक्यातील १० कर्तबगार महिलांचा सन्मान भाजपा महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर यांच्या हस्ते केला गेला. याप्रसंगी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, अॅड. सुषमा खानोलकर, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, महिला तालुका अध्यक्षा सुजाता पडवळ, शहर अध्यक्षा श्रेया मयेकर, तालुका सरचिटणीस पपु परब, प्रार्थना हळदणकर, साक्षी पेडणेकर, कृपा मोंडकर, आकांक्षा परब, समिधा कुडाळकर, हसीनाबेन मकानदार आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी मार्गदर्शन करताना महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर म्हणाल्या की महिलांच्या कामगिरीचा सन्मान आणि लिंग समानतेचा पुरस्कार करण्यासाठी ८ मार्च हा दिवस जागतिक स्तरावर आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो. स्त्री पुरुष समानतेचा पुरस्कार करतानाच वेंगुर्ले तालुक्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत वेंगुर्ल्याच्या गौरवात भर घालणाऱ्या निवडक दहा महिलांचा सन्मान केला. वेंगुर्ल्यात जागतिक महिला दिन साजरा केल्याबद्दल पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत २०१४ पासुन मोदी सरकार आल्यानंतर खऱ्या अर्थाने महिलांना सन्मानाची वागणूक मिळत असल्याचे म्हणत, मोदी सरकारने महिलांना आत्मनिर्भर बनविण्यात मोलाची कामगिरी बजावल्याचे व्यक्त केले.यावेळी एमबीएपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेली दाभोली गावची सुकन्या आराधना अमृत कुंडेकर, संगीत शिक्षिका सौ.विणा हेमंत दळवी, काथ्या उद्योजिका सौ. रुची राजाराम राऊळ, नाट्यकलाकार सौ. मिताली महेंद्र मातोंडकर, महिला फोटोग्राफर सौ.स्मिता शंकर कासले, दशावतारातील पहिली महिला पखवाज वादक भाविका लक्ष्मण खानोलकर, बॉक्सिंग क्षेत्रात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्ण पदकाची मानकरी ठरलेली मारिया आशिष अल्मेडा, गायिका अमृता श्रीकृष्ण पेडणेकर, मुंबई विद्यापीठस्तरीय विविध अॅथलेटिक्स स्पर्धेत सुवर्ण पदक विजेती गायत्री राजाराम राणे, दिव्यांग महिलांच्या क्रिकेट स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणारी सोशल मीडियावर अॅक्टिव असणारी प्राजक्ता माळकर उर्फ जपा यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर यांचे स्वागत तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसन्ना उर्फ बाळु देसाई व प्रास्ताविक अॅड. सुषमा खानोलकर तसेच आभार प्रदर्शन सुजाता पडवळ यांनी केले.