तिलारीचा सुपुत्र साहिल शेटवेची 'मुंबई मेट्रो'मध्ये निवड
तिलारी
जिद्द, चिकाटी आणि कष्टाच्या जोरावर ग्रामीण भागातील तरुणही आकाशाला गवसणी घालू शकतात, याचाच प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. तिलारी (दोडामार्ग) येथील साहिल शरद शेटवे या तरुणाची मुंबई मेट्रोमध्ये निवड झाली असून, त्याच्या या यशाने संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण आहे.साहिलचे प्राथमिक शिक्षण साटेली भेडशी येथील करुणा सदन हायस्कूलमध्ये ८ वी पर्यंत झाले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्याने दोन वर्षे मुंबईत घालवली. तांत्रिक शिक्षणाची आवड असल्याने त्याने शासकीय तंत्रनिकेतन, मालवण येथून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा पूर्ण केला. विशेष म्हणजे, सध्या तो पदवीच्या तृतीय वर्षात शिक्षण घेत असतानाच त्याने हे मोठे यश संपादन केले आहे.अत्यंत सामान्य आणि ग्रामीण पार्श्वभूमी असतानाही, साहिलने तांत्रिक क्षेत्रात स्वतःला सिद्ध केले आहे. मुंबई मेट्रोसारख्या मोठ्या प्रकल्पात काम करण्याची संधी मिळवणे ही केवळ साहिलसाठीच नव्हे, तर दोडामार्ग तालुक्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. त्याच्या या यशामुळे ग्रामीण भागातील इतर विद्यार्थ्यांनाही तांत्रिक शिक्षणाकडे वळण्याची आणि मोठ्या स्वप्नांचा पाठलाग करण्याची प्रेरणा मिळाली आहे.साहिलच्या या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

konkansamwad 
