सावंतवाडी नळपाणी योजनेवरून पालिकेच्या विशेष सभेत खडाजंगी.....जानेवारीअखेर काम पूर्ण करण्याचे नगराध्यक्षांचे आश्वासन

सावंतवाडी नळपाणी योजनेवरून पालिकेच्या विशेष सभेत खडाजंगी.....जानेवारीअखेर काम पूर्ण करण्याचे नगराध्यक्षांचे आश्वासन

सावंतवाडी

 

    सावंतवाडी शहरात सुरू असलेल्या ५७ कोटींच्या बहुचर्चित नळपाणी योजनेचे काम आतापर्यंत ५२ टक्के पूर्ण झाले आहे. कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याने हे काम तात्पुरते थांबवून त्याचे 'थर्ड पार्टी ऑडिट' करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर पुढील दिशा ठरवण्यासाठी पालिकेची विशेष सभा बोलावण्यात आली होती. सभेच्या सुरुवातीला काही नगरसेवकांनी ऑडिट अहवालातील अनियमिततेवर आक्षेप घेत जोरदार खडाजंगी केली. मात्र, "केवळ विरोधासाठी विरोध करू नये आणि जानेवारीअखेर ५७ कोटींच्या नळपाणी योजनेचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे," अशी परखड भूमिका माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक संजू परब यांनी घेतली. काही नगरसेवकांनी नागरिकांच्या हितासाठी या कामाला सकारात्मक पाठिंबा दर्शवला. अखेर सभागृहाने या भूमिकेला पाठिंबा दिल्याने एकमत झाले असून, जानेवारीअखेर ही योजना पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे आणि काम दर्जेदार करून घेण्याची जबाबदारी पालिकेची असल्याचे नगराध्यक्ष श्रद्धा भोसले यांनी यावेळी जाहीर केले.