सिंधुदुर्गातील आठही तालुके दुष्काळाच्या ‘ट्रिगर-१’ मध्ये; २६५ तालुक्यांत पंचनाम्याचे आदेश
सिंधुदुर्गनगरी
पावसाची तूट आणि खरीप हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठही तालुक्यांचा दुष्काळ व्यवस्थापनाच्या ‘ट्रिगर-1’ मध्ये समावेश झाला आहे.कृषी आयुक्तांच्या २४ सप्टेंबर २०२६ च्या अहवालानुसार राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून या तालुक्यांमध्ये तातडीने पंचनामे सुरू करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.दरम्यान पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दुष्काळी भागाची पाहणी केली होती. उद्या पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात यासंदर्भात आढावा बैठक होणार आहे.
शेतकऱ्यांना मिळणार या सवलती
ट्रिगर-1 लागू झालेल्या तालुक्यांमध्ये शासनाने विशेष बाब म्हणून सवलती जाहीर केल्या आहेत.
- जमीन महसुलात सूट
- पीक कर्जाचे पुनर्गठन आणि वसुलीस स्थगिती
- कृषी पंपाच्या चालू वीजबिलात सूट (७.५ HP पर्यंतचे बिल यापूर्वीच माफ)
- शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी
- रोहयो अंतर्गत कामांच्या निकषात शिथिलता
- टँकरने पाणीपुरवठा, कृषी पंपाची वीज जोडणी खंडित न करणे
- जनावरांसाठी चारा आणि पिण्याच्या पाण्याचे नियोजन
पंचनाम्यादरम्यान पिकांची स्थिती, फोटो आणि GPS coordinates संकलित करून अहवाल कृषी आयुक्तांमार्फत शासनाला सादर केला जाणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष मदतीचा मार्ग स्पष्ट होणार आहे.
konkansamwad 
