मळेवाड येथे पिकअप गाडीचा अपघात, तिघे जण थोडक्यात बचावले.
सावंतवाडी
मळेवाड येथील प्राथमिक शाळेजवळील धोकादायक वळणावर अपघात घडला. दोडामार्गवरून शिरोड्याच्या दिशेने जाणाऱ्या एका चारचाकी पिकअप गाडीला हा अपघात झाला. वळणावर गाडी अचानक स्लीप होऊन थेट गटारात पलटी झाली. या अपघातात दीपक नाईक (वय ४६, रा. शिरोडा) आणि ऋषिकेश कासकर (वय ३१, रा. आरवली) यांना किरकोळ दुखापत झाली आहे. केवळ 'दैव बलवत्तर' म्हणून गाडीतील तिन्ही प्रवासी या मोठ्या अपघातातून सुखरूप बचावले आहेत. या अपघातात गाडीचे मात्र प्रचंड नुकसान झाले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, एक चारचाकी पिकअप वाहन दोडामार्गहून शिरोड्याकडे जात होती. मळेवाड प्राथमिक शाळेच्या जवळील वळणावर गाडी आली असता, सध्या सुरू असलेल्या पावसामुळे रस्ता कमालीचा निसरडा बनला होता. या निसरड्या रस्त्यावरून अचानक चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी थेट रस्त्याशेजारील गटारात जाऊन कलंडली. यामुळे झालेल्या मोठ्या आवाजाने आसपासच्या स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली. ग्रामस्थांनी मोठ्या तत्परतेने गाडीत अडकलेल्या प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले आणि कोणताही वेळ न घालवता त्यांना जवळच असलेल्या मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. मसके यांनी जखमींवर तातडीने प्राथमिक उपचार केले. सुदैवाने गाडीतील सर्व प्रवासी सुरक्षित असून एक मोठा अनर्थ टळला आहे. मात्र, मळेवाड परिसरातील या निसरड्या बनलेल्या वळणावर वाहनचालकांनी गाडी चालवताना योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन केले जात आहे.
konkansamwad 
