सत्ताधाऱ्यांच्या 'हप्तेखोरी'मुळे सिंधुदुर्गातील पारंपरिक मच्छीमार देशोधडीला - वैभव नाईक

सत्ताधाऱ्यांच्या 'हप्तेखोरी'मुळे सिंधुदुर्गातील पारंपरिक मच्छीमार देशोधडीला - वैभव नाईक

मालवण

 

    सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सत्ताधारी आमदार आणि मंत्री हे मच्छीमार विरोधी असून त्यांच्या आशीर्वादानेच समुद्रात बेकायदेशीर एलईडी आणि पर्ससीन मासेमारी फोफावली आहे. एकीकडे कारवाईचे नाटक करायचे आणि दुसरीकडे रत्नागिरी-सिंधुदुर्गातील आमदारांनी फोन करून संबंधित बोटधारकांना सोडायला सांगायचे, असा संतापजनक प्रकार जिल्ह्यात सुरू आहे, असा खळबळजनक आरोप माजी आमदार वैभव नाईक यांनी पत्रकार परिषदेत केला. येथील ठाकरे शिवसेना पक्षाच्या कार्यालयात पत्रकार परिषद झाली. यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहरप्रमुख बाबी जोगी, महेश जावकर, मंदार ओरसकर, तपस्वी मयेकर, दीपा शिंदे, पूजा करलकर, राका रोगे, अन्वय प्रभू, नंदू गवंडी, रवी तळाशीलकर, बंड्या सरमळकर, दत्ता पोईपकर, नितीन राऊळ, स्वप्नील आचरेकर यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.नाईक म्हणाले, पालकमंत्री आणि मत्स्यविकास मंत्री एलईडी बंदीच्या केवळ वल्गना करत आहेत. प्रत्यक्षात केवळ १०-१२ बोटींवर कारवाई करून मत्स्य विभाग हात झटकत आहे.दिवसाढवळ्या किनाऱ्यालगत बेकायदेशीर बोटी वावरत असताना, सत्ताधाऱ्यांचे फोन येतात म्हणून कारवाई करता येत नाही, अशी कबुली अधिकारी खासगीत देत असल्याचे नाईक यांनी नमूद केले. मच्छीमारांना मिळणाऱ्या डिझेलच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. बाजारात ९३ रुपये दराने मिळणारे डिझेल आता मच्छीमारांना महाग पडत आहे. डिझेल परतावा वेळेवर मिळत नसल्याने जिल्हयातील मच्छीमारांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. यामुळे किनारपट्टीचे संपूर्ण अर्थकारण धोक्यात आले आहे. अवैध मासेमारी रोखण्यासाठी स्पीड बोटी आणू," असे आश्वासन सरकारने दिले होते, मात्र या बोटी कुठे आहेत? असा सवाल नाईक यांनी केला. सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्तेच या अवैध मासेमारीत गुंतले असून, त्यांच्याकडून दरमहा लाखो रुपयांची हप्तेखोरी सुरू असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. एलईडी मासेमारीमुळे समुद्रातील मासळी ओरबाडून नेली जात आहे. परिणामी, पारंपरिक मच्छीमारांच्या जाळ्यात मासे मिळेनासे झाले आहेत. सरकार परदेशात होणाऱ्या मोठ्या निर्यातीचे आकडे फुगवून सांगत असले, तरी स्थानिक कष्टकरी मच्छीमार मात्र उपासमारीच्या उंबरठ्यावर आहे. वैभव नाईक यांनी स्पष्ट केले की,सत्ताधारी आमदारांनी मच्छीमारांना वाऱ्यावर सोडले असले तरी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष खंबीरपणे त्यांच्या पाठीशी आहे. मी स्वतः, परशुराम उपरकर आणि हरी खोबरेकर आम्ही सर्वजण मच्छीमारांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरू. १० वर्षांपूर्वी आम्ही जसा मच्छीमारांना न्याय दिला होता, तसाच न्याय पुन्हा मिळवून देण्यासाठी मत्स्य विभागाच्या विरोधात लवकरच तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. मच्छीमारांनी आणि सामाजिक संस्थांनी आता एकत्र येण्याची वेळ आली आहे. सत्ताधाऱ्यांची हप्तेखोरी बंद पाडल्याशिवाय पारंपरिक मच्छीमार वाचणार नाही. असेही माजी आमदार नाईक यांनी स्पष्ट केले.