वेंगुर्लेत हिंदू नववर्षाचे जल्लोषात स्वागत
वेंगुर्ले
शहरात गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर समस्त ग्रामस्थांच्या वतीने हिंदू नववर्ष स्वागत यात्रा अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली.या सोहळ्याला भाजप युवा नेते विशाल परब आणि सौ. वेदिका परब यांनी प्रमुख उपस्थिती लावून नागरिकांचा उत्साह वाढवला. पारंपारिक वेशभूषा केलेल्या नागरिकांनी ढोल-ताशांच्या गजरात आणि जयघोषात संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता.या यात्रेची सुरुवात श्री देव रामेश्वर मंदिरापासून झाली. तिथून शिरोडा नाका, दामले नाका, बाजारपेठ आणि मारुती मंदिर अशा मार्गावरून मार्गक्रमण करत पुन्हा रामेश्वर मंदिर येथे यात्रेचा समारोप झाला. याप्रसंगी बोलताना विशाल परब यांनी सांगितले की, अशा सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे आपल्या संस्कृतीचे जतन होते आणि समाजात एकात्मता निर्माण होते. त्यांनी सर्व नागरिकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छाही दिल्या.या स्वागत यात्रेत महिला, तरुण आणि लहान मुलांनी मोठ्या संख्येने आणि उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. पारंपारिक पद्धतीने झालेल्या या स्वागत सोहळ्यामुळे संपूर्ण वेंगुर्ला शहरात आनंदाचे आणि चैतन्याचे वातावरण पाहायला मिळाले.
konkansamwad 
