आंबोलीत दिव्यांग बांधवांचा पहिला विभागीय मेळावा उत्साहात....गरजूंना श्रवणयंत्र, वॉकिंग स्टिकसह उपयुक्त साहित्यांचे वाटप 

आंबोलीत दिव्यांग बांधवांचा पहिला विभागीय मेळावा उत्साहात....गरजूंना श्रवणयंत्र, वॉकिंग स्टिकसह उपयुक्त साहित्यांचे वाटप 


आंबोली

 

   
       सिंधुदुर्ग साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था कसाल, महात्मा गांधी सेवा संघ संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र सिंधुदुर्ग आणि आंबोली ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने आंबोली विभागातील सर्व दिव्यांग बांधवांचा पहिला वहिला विभागीय मेळावा उत्साहात संपन्न झाला.कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते जगप्रसिद्ध विचारवंत व सामाजिक कार्यकर्त्या हेलन केलर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली. यावेळी संस्थेच्या कर्मचारी विशाखा कासले यांनी संस्थेच्या कार्याचा अहवाल सादर केला.संस्थेचे अध्यक्ष अनिल शिंगाडे यांनी दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन करताना सांगितले, "आम्ही थेट तुमच्यापर्यंत तुमच्या समस्या आणि अडचणी जाणून घेण्यासाठी आलो आहोत. दिव्यांग बांधवांनी आपल्या अडचणी मांडून या मेळाव्याचा व शासनाच्या योजनांचा जास्तीत जास्त फायदा करून घ्यावा."आंबोलीच्या सरपंच सौ. सावित्री पालयेकर यांनी दिव्यांग बांधवांना आश्वस्त केले की, "तुमच्या ज्या काही समस्या किंवा अडचणी असतील, त्या आमच्याकडे मांडायला संकोच करू नका, आम्ही त्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू." तांत्रिक अडचणींचे निवारण अनिल शिंगाडे यांच्या माध्यमातून करून घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.या मेळाव्याला 40 हून अधिक दिव्यांग बांधव उपस्थित होते. यावेळी साईकृपा संस्थेच्या वतीने नेहा पटकारे आणि सिद्धी पडवळ यांना श्रवणयंत्र, तर बाळकृष्ण गावडे यांना वॉकिंग स्टिक प्रदान करण्यात आली. याशिवाय उपस्थित सर्व दिव्यांग बांधवांना संस्थेच्या वतीने उपयुक्त भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले.या मेळाव्याला सरपंच सावित्री पालयेकर, ग्रामपंचायत सदस्य दीपक नाटलेकर, ग्रामपंचायत अधिकारी एस.जी. गोसावी, राष्ट्रीय दृष्टीहीन महासंघाचे अध्यक्ष बाबुराव गावडे, सौ. सविता गावडे, विनायक देसाई, साईकृपा संस्थेचे अध्यक्ष अनिल शिंगाडे, विशाखा कासले, प्रसन्ना शिर्के, ललित गावडे, पवित्रा शिर्के आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाच्या शेवटी संस्था कर्मचारी पवित्रा शिर्के यांनी आभार मानले. हा विशेष मेळावा यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आंबोलीच्या माजी सरपंच तथा प्रशासक सौ. सावित्री पालेकर यांनी विशेष आभार मानले.