उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६.....स्पर्धेसाठी गणेश मंडळांनी ७ सप्टेंबरपर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन
सिंधुदुर्ग, दि. २७
महाराष्ट्र शासनाने गणेशोत्सव हा राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला असून, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने राज्य महोत्सवांतर्गत उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेची व्याप्ती तालुका, जिल्हा, राज्य यासोबतच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत वाढविण्यात आली आहे. जिल्ह्यातील अधिकाधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.स्पर्धेसाठी इच्छुक व पात्र मंडळांनी पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या ganeshotsav.pldmka.co.in या ऑनलाइन पोर्टलवर दि. ७ सप्टेंबर २०२६ पर्यंत अर्ज सादर करावा. ही स्पर्धा विनामूल्य असून, केवळ संबंधित यंत्रणेकडे नोंदणीकृत संस्था अथवा परवानाधारक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनाच सहभागी होता येणार आहे. स्पर्धेचे समन्वयक म्हणून पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी कार्यरत राहणार आहे.स्पर्धेत तालुकास्तरावर प्रथम क्रमांकासाठी २५ हजार रुपये, जिल्हास्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे ५० हजार, ४० हजार व ३० हजार रुपये, तर राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे ७ लाख ५० हजार, ५ लाख आणि २ लाख ५० हजार रुपये रोख पारितोषिक व सन्मानपत्र देण्यात येणार आहे. जिल्हास्तरावरून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या अन्य मंडळांनाही शासन निर्णयानुसार प्रोत्साहनपर पारितोषिक देण्यात येणार आहे. निवड संबंधित स्तरावर गठित करण्यात आलेल्या निवड समितीमार्फत करण्यात येईल.
स्पर्धेसाठी महत्त्वाच्या अटी व शर्ती
- संबंधित यंत्रणेकडे नोंदणीकृत संस्था अथवा परवानाधारक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनाच स्पर्धेत सहभागी होता येईल.
- इतर मंडळांना संधी मिळावी, या उद्देशाने चालू आर्थिक वर्षाच्या मागील सलग दोन वर्षांत राज्यस्तरीय किंवा जिल्हास्तरीय पारितोषिक प्राप्त झालेली मंडळे यंदाच्या पारितोषिकासाठी पात्र राहणार नाहीत. ही अट राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेलाही लागू राहील.
- मंडळाने केलेल्या कामाचा कालावधी मागील वर्षाच्या अनंत चतुर्दशीपासून चालू वर्षाच्या अनंत चतुर्दशीपर्यंत ग्राह्य धरला जाणार आहे.
- स्पर्धेच्या परीक्षणासाठी निवड समितीने निश्चित केलेल्या दिवशी व वेळी संबंधित कागदपत्रे व आवश्यक माहिती समितीला उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित गणेशोत्सव मंडळाची राहील.
- तालुका, जिल्हा, राज्य, राष्ट्रीय अथवा आंतरराष्ट्रीय स्तरावरील निवड समितीने घेतलेल्या निर्णयावर कोणत्याही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला आक्षेप घेता येणार नाही.
- स्पर्धेचे परीक्षण १०० गुणांच्या निकषांवर करण्यात येणार असून, कला-संस्कृतीचे जतन व संवर्धन, विविध सामाजिक व विधायक उपक्रम, पर्यावरण संवर्धन, गडकिल्ले-वने-स्मारकांचे जतन, आरोग्य व जनजागृती, पारंपरिक कला व देशी खेळांना प्रोत्साहन, पर्यावरणपूरक मूर्ती व सजावट, भाविकांसाठी सुविधा तसेच मंडळाच्या कार्यकारिणीत किमान ३० टक्के महिलांचा सहभाग अशा विविध बाबींचा विचार केला जाणार आहे.
- पर्यावरणपूरक गणेशोत्सव, सामाजिक बांधिलकी, कला-संस्कृतीचे संवर्धन आणि समाजोपयोगी उपक्रमांना स्पर्धेत विशेष महत्त्व राहणार आहे.
- पात्र मंडळांनी विहित मुदतीत ऑनलाइन अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
जिल्ह्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी स्पर्धेच्या सविस्तर अटी, निकष, आवश्यक कागदपत्रे आणि अर्जाची प्रक्रिया जाणून घेण्यासाठी ganeshotsav.pldmka.co.in या पोर्टलला भेट देऊन विहित मुदतीत अर्ज सादर करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
konkansamwad 
