वेंगुर्ला तालुक्यात दुर्मिळ ‘खापर खवल्या’ सापाचे दर्शन....सर्पमित्र महेश राऊळ यांच्या अभ्यासात भर
वेंगुर्ला
वेंगुर्ला तालुक्यातील तुळस काजरमळी येथे बिनविषारी आणि दुर्मिळ ‘खापर खवल्या’ जातीच्या सापाचे दर्शन झाले आहे. याच गावातील हर्षवर्धन तांबोसकर आणि समीर शेटकर यांना रस्त्यावर एका जागी बसून असलेला छोटा साप आढळला. तो जखमी असल्याचा संशय आल्याने त्यांनी सर्पमित्र महेश राऊळ यांना तातडीने माहिती दिली.महेश राऊळ यांनी पाहणी केल्यानंतर हा बिनविषारी दुर्मिळ खापर खवल्या जातीचा साप असल्याचे ओळखले. सापाने काहीतरी खाल्ल्यामुळे तो शांत बसून असल्याचे लक्षात आले. तो निरोगी असल्याचे स्पष्ट होताच राऊळ यांनी त्याला सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडून दिले.या सापाचे इंग्रजी नाव Shield-tailed Snake किंवा महाबळेश्वर शिल्डटेल आहे. शेपटीचा भाग आडवा खाप दिल्यासारखा असल्यामुळे याला ‘खापर खवल्या’ असे नाव पडले आहे. याची लांबी 15 ते 25 सेंमी असून जास्तीत जास्त 30 सेंमी म्हणजे 1 फूटपर्यंत वाढतो. शरीर गडद तपकिरी ते काळपट असून खवले चमकदार आणि मोठे आहेत.सर्व सापांमध्ये सर्वात संथ गतीचा असणारा हा साप भित्र्या स्वभावाचा आहे. शेपटी दाबली तरी हल्ला न करता तो पुढे पळतो किंवा मातीत डोके खुपसतो. हा साप पूर्णपणे बिनविषारी आहे. मुख्यतः जमिनीखाली राहणारा हा साप भक्ष्याच्या शोधात जमिनीवर येतो. पावसाळ्यातच तो दिसतो. उन्हाळा आणि हिवाळ्यात जमिनीखाली निद्रिस्त असल्यामुळे एरवी तो सहसा दिसत नाही. गांडूळ, सरपटणारे किडे, अळ्या व इतर छोटे जीवजंतू हे त्याचे खाद्य आहे. तो निशाचर असून रात्री संचार करतो.वन्यजीव अभ्यासकांच्या मते ‘खापर खवल्या’ सापाचे आढळणे हे परिसंस्थेच्या आरोग्यासाठी शुभचिन्ह मानले जाते. ही प्रजाती अतिशय दुर्मिळ आहे.यावेळी सर्पमित्र महेश राऊळ यांनी जनतेला आवाहन केले की, अज्ञानामुळे कोणत्याही सापाला मारू नये. खापर खवल्यासारखे दुर्मिळ साप नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. साप दिसल्यास सर्पमित्र किंवा वनविभागाला कळवावे जेणेकरून त्याचे सुरक्षित स्थलांतर करता येईल.पश्चिम घाटात आढळणारी ही दुर्मिळ प्रजाती निसर्गाच्या आरोग्याचे लक्षण असल्याचे त्यांनी सांगितले.
konkansamwad 
