कोंडये ग्रामस्थांनी राबवली अभिनव स्वच्छता मोहीम

कोंडये ग्रामस्थांनी राबवली अभिनव स्वच्छता मोहीम

कणकवली

 

    आरोग्यासाठी सकाळी फिरताना केवळ स्वतःचे आरोग्यच नव्हे, तर गावाचे आरोग्यही जपले पाहिजे, हा आदर्श कणकवली तालुक्यातील कोंडये ग्रामस्थांनी घालून दिला आहे. रविवारी सकाळी 'स्वच्छता मिशन सिंधुदुर्ग' आणि कोंडये ग्रामस्थांच्या वतीने राबवण्यात आलेल्या विशेष 'मॉर्निंग वॉक स्वच्छता मोहिमेत' सहभागी होत ग्रामस्थांनी दोन तासांच्या परिश्रमानंतर गावातील प्रमुख रस्ते प्लास्टिकमुक्त केले. आरोग्य आणि स्वच्छता या दोन्ही गोष्टी एकाच वेळी साध्य करण्याच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.सकाळी फिरताना रस्त्याच्या दुतर्फा असलेला प्लास्टिक कचरा उचलून परिसर स्वच्छ ठेवता येतो, ही संकल्पना ज्येष्ठ पत्रकार आणि स्वच्छता प्रेमी गणेश जेठे यांनी गेल्या पाच-सहा वर्षांपासून स्वतःच्या कृतीतून मांडली आहे. त्यांच्या या प्रयत्नांना व्यापक स्वरूप देण्यासाठी रविवारी कोंडये आणि करंजे गावाच्या हद्दीवरून या मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी नायब तहसीलदार दिलीप पाटील यांनी मॉर्निंग वॉक स्वच्छता मोहिमेचे महत्त्व विशद केले, तर हरकुळखुर्दचे माजी उपसरपंच संजय रावले यांनी या उपक्रमाची प्रेरणा घेऊन आपल्या गावातही अशी मोहीम राबवणार असल्याचे सांगितले. जिल्हा परिषदेचे आदर्श शिक्षक विद्याधर तांबे यांनीही या मोहिमेत सहभागी होत आरोग्य आणि स्वच्छता या दोन्ही उद्दिष्टांवर प्रकाश टाकला.या मोहिमेत माजी पंचायत समिती सदस्य महेंद्र डीचवलकर, पत्रकार सचिन राणे, विनायक पाताडे, तुषार नेवरेकर, प्रा. शेख, विजय जामदार, अशोक पेडणेकर, अभिजित लोके, माजी सरपंच दिगंबर मेस्त्री, अनिल मेस्त्री यांच्यासह प्रदीप फोपे, रोहित मोंडकर, दर्वेश परब, सिद्धेश मोंडकर, राजन धोपटे, अनिकेत जेठे, निलेश मेस्त्री व इतर अनेक ग्रामस्थ आणि तरुणांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. मुंबईस्थित चाकरमानी मधुकर जोईल यांनी या मोहिमेसाठी टी-शर्ट पुरवून पाठिंबा दिला, तर विद्याधर तांबे यांनी चहा-पाण्याची व्यवस्था केली.यावेळी गणेश जेठे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, स्वच्छता मिशनच्या माध्यमातून संपूर्ण जिल्हा स्वच्छ करण्याचे उद्दिष्ट असले, तरी आपले गाव पहिल्यांदा स्वच्छ ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. रविवारच्या या विशेष मोहिमेत गावातील तरुणांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.कोंडये गाव स्वच्छ आणि सुंदर करण्याचे स्वप्न सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने नक्कीच पूर्ण होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.