आमिष दाखवून सलून व्यावसायिकाला पाच लाखांचा गंडा......वेंगुर्ले तालुक्यातील मठ कुडाळतीठा येथील घटना
वेंगुर्ला
वेंगुर्ले तालुक्यातील मठ कुडाळतीठा (मुळ रा. शहापूर, बेळगाव) येथील सलून व्यावसायिक रोहन गजानन कडगावकर यांची दोन अज्ञात इसमानी सोन्याचे आमिष दाखवून पाच लाख रुपये रोख रक्कम घेऊन आर्थिक फसवणूक केली आहे, अशी तक्रार कडगावकर यांनी वेंगुर्ला पोलीस स्थानकात दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे की, १६ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास मठ कुडाळ तिठा येथे आपल्या सलून च्या ठिकाणी ही घटना घडली. दोन अनोळखी इसमानी माझा विश्वास संपादन करून आपल्या आईची तब्येत बरी नसून पाच लाख रुपयांची गरज आहे, असे सांगून त्या बदल्यात आम्ही सोने देतो असे सांगून तांबे या धातूच्या माळांचा गुच्छ देऊन ते सोन्याचे आहेत, असे सांगून पाच लाख रुपये रोख रक्कम घेऊन जाऊन आर्थिक फसवणूक केली आहे. याबाबत दाखल फिर्यादीनुसार वेंगुर्ला पोलीस स्थानकात अज्ञाता विरोधात बीएनएस कलम ३१८ (४).३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी वेंगुर्ला पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश राठोड हे अधिक तपास करीत आहेत.
konkansamwad 
