पिंगुळी पाझर तलाव वाद तापला.....परशुराम उपरकर यांचा राणे कुटुंबीयांवर गंभीर आरोप
कुडाळ
पिंगुळी पाझर तलाव बचाव आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी राणे कुटुंबीय आणि परप्रांतीय बिल्डर यांच्यातील कथित संबंधांवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. संबंधित बिल्डरला वाचवण्यासाठी राणे कुटुंबीय मदत करत असल्याचा आरोप करत या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.कुडाळ येथील एमआयडीसी विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, माजी उपसभापती बबन बोबाटे, नगरसेवक मंदार शिरसाट, संतोष शिरसाट आणि बाळा पावसकर उपस्थित होते. आमदार निलेश राणे यांनी व्हिडीओ प्रसिद्ध करून पिंगुळी पाझर तलाव बचाव आंदोलनात फूट पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप उपरकर यांनी केला. ग्रामस्थ गेल्या तीन दिवसांपासून आपल्या हक्कासाठी, न्यायासाठी आणि पाण्यासाठी एकजुटीने उपोषण करत असून त्यांच्या आंदोलनात कोणतीही फूट पडणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले.राणे कुटुंबीयांचे संबंधित बिल्डरशी नेमके काय संबंध आहेत असा सवाल उपस्थित करताना उपरकर यांनी लंडन दौऱ्यातील कथित भेटीचा तसेच मंत्री नितेश राणे यांच्या स्वीडन दौऱ्यात डॉ. बाणवलीकर आणि अंकित कन्सर्न यांच्या उपस्थितीचा उल्लेख केला. या भेटींचा आणि दौऱ्यांचा संबंधित बिल्डरशी असलेल्या संबंधांशी काय संबंध आहे याचे स्पष्टीकरण राणे कुटुंबीयांनी द्यावे असे ते म्हणाले.पिंगुळीतील कथित प्रकल्पाच्या मोजणीसाठी आमदार निलेश राणे यांनी भूमी अभिलेख विभागाला फोन करून तसेच पत्र देऊन आठ दिवसांत मोजणी करून घेतल्याचा आरोपही त्यांनी केला. सर्वसामान्य नागरिकांना मात्र मोजणीसाठी चार-चार महिने कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागतात. तसेच पिंगुळीच्या सरपंचांवर दबाव आणून त्यांच्या मनाविरुद्ध ठराव करून घेण्यात आल्याचा आरोपही उपरकर यांनी केला.राणे कुटुंबीय परप्रांतीय व्यावसायिकांना जिल्ह्यात आणून मोठे करत असल्याचा आरोप करताना या प्रकल्पासाठी जिल्हा बँकेने साडेनऊ कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे. ही जिल्हा बँक कोणाच्या ताब्यात आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केला. पिंगुळीसह सासोली येथेही अशा प्रकारची अलिखित भागीदारी असल्याचा दावा त्यांनी केला. डॉ. बाणवलीकर यांनी वैद्यकीय व्यवसाय सोडून लोकांच्या जमिनी फसवून लाटण्याचा उद्योग सुरू केल्याचा आरोपही त्यांनी केला.पिंगुळीतील पाझर तलावाचे पाणी टिकवण्यासाठी ग्रामस्थ उपोषणाला बसले असतानाही जिल्हाधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट दिलेली नाही याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. जिल्ह्यात नवीन बंधारे बांधण्यासाठी निधी उपलब्ध होतो, मात्र अस्तित्वातील पाणीसाठा वाचविण्यासाठी आंदोलन करणाऱ्या ग्रामस्थांकडे दुर्लक्ष का केले जात आहे असा सवाल त्यांनी केला. अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव असल्याचा आरोपही त्यांनी केला. या आंदोलनाला सर्वपक्षीय पाठिंबा मिळावा यासाठी संबंधित पक्षांना पत्र देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.पालकमंत्री राजकीय विधाने करतात त्यावेळी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक त्यांच्या आसपास दिसतात. राजकीय कार्यक्रम आणि शासकीय कामकाज यांची सरमिसळ होऊ नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देणार असल्याचे उपरकर यांनी सांगितले. मंजुरी आणि निधी नसलेल्या प्रकल्पांच्या उद्घाटनांबाबत मुख्य सचिवांकडे तक्रार करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.राणे कुटुंबीयांनी एकत्र येऊन रवळनाथ मंदिरात यावे. त्यावेळी वैभव नाईक, आपण आणि जिल्हा परिषद सदस्य गंगाराम सडवेलकरही उपस्थित राहू. संबंधित बिल्डरशी कोणताही आर्थिक अथवा व्यावसायिक संबंध नसल्याचे राणे कुटुंबीयांनी तेथे स्पष्ट करावे असे खुले आव्हान उपरकर यांनी दिले.पिंगुळी पाझर तलाव परिसरात तीन पंप आणि एका बोअरवेलच्या माध्यमातून पाण्याचा उपसा केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. अंतिम रेखांकनापूर्वी जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांनी हा परिसर लघुपाटबंधारे विभागाच्या जागेत येत असल्याने रेखांकन देऊ नये असे पत्र दिले होते. असे असतानाही दबावाखाली मंजुरी देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
konkansamwad 
