कणकवलीतील वाहन पार्किंगचा प्रश्न सुटणार कधी?....महामार्गाचे काम पूर्ण होऊन वर्षे उलटली....मात्र पार्किंगचा प्रश्न कायम!
कणकवली
कणकवली शहरात सायंकाळच्या वेळेत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून यामागील प्रमुख कारणांपैकी एक म्हणजे वाहन पार्किंगसाठी अपुरी जागा. मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण होऊन अनेक वर्षे उलटली, मात्र शहरातील वाहन पार्किंगचा प्रश्न आजही कायम आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील हा महत्त्वाचा प्रश्न दुर्लक्षित राहिला असून त्यावर अद्याप कायमस्वरूपी तोडगा निघालेला नाही.सायंकाळच्या वेळेत बाजारपेठेत खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांची आणि वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. मात्र दुचाकी आणि चारचाकी वाहने उभी करण्यासाठी पुरेशी व नियोजनबद्ध पार्किंग व्यवस्था नसल्याने वाहनचालकांसमोर मोठा प्रश्न निर्माण होतो. वाहन घेऊन शहरात यायचे, पण पार्किंग करायचे कुठे? असा प्रश्न अनेक वाहनचालकांना पडतो. अखेर नाईलाजाने मिळेल त्या ठिकाणी वाहने उभी केली जातात. यामुळे रस्त्यांवरील वाहतुकीला अडथळा निर्माण होतो आणि वाहतूक कोंडीची समस्या अधिक गंभीर बनते. केवळ बैठका आणि चर्चांमधून हा प्रश्न सुटणार आहे का? की प्रत्यक्षात पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने पावले उचलली जाणार आहेत, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे.शहराचा विस्तार होत असताना वाहनांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. बाजारपेठेत येणारे व्यापारी, ग्राहक, नोकरदार आणि ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांना पार्किंगच्या समस्येचा सामना करावा लागतो. केवळ वाहतूक पोलिसांकडून कारवाई करून हा प्रश्न सुटणार नाही, तर शहरात नियोजनबद्ध पार्किंगची व्यवस्था निर्माण करणे ही काळाची गरज बनली आहे.कणकवली शहराच्या विकासाच्या चर्चा अनेकदा होतात; मात्र शहरातील नागरिकांना रोज भेडसावणाऱ्या वाहन पार्किंगच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देणार कोण? या समस्येवर तोडगा निघणार कधी? कणकवली शहरातील पार्किंग व्यवस्थेची गंभीर समस्या नेमकी कोण दूर करणार आणि त्यासाठी प्रत्यक्ष कृती कधी होणार, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.
konkansamwad 
