मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी कुडाळात मविआ देणार निवेदन

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी कुडाळात मविआ देणार निवेदन

कुडाळ 


      भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या एकतर्फी कारभाराविरोधात आणि त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व महाविकास आघाडीच्या वतीने सोमवार दि. २८ सप्टेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता कुडाळ प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे.मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी घेतलेल्या निर्णयांवर इतर दोन निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंग संधू आणि डॉ. विवेक जोशी यांनी किमान १४ वेळा लिखित आक्षेप नोंदवले आहेत. निवडणूक आयोगाचे निर्णय बहुमताने किंवा एकमताने घेणे बंधनकारक असताना ज्ञानेश कुमार यांनी इतर आयुक्तांच्या विरोधाकडे दुर्लक्ष करून एकतर्फी निर्णय घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.ज्ञानेश कुमार यांनी लोकशाहीचा गळा घोटून देशाशी गद्दारी केली असून त्यांच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी हे निवेदन देण्यात येणार आहे. माजी आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत हे निवेदन दिले जाणार आहे.यावेळी शिवसेना, महिला आघाडी, युवासेना आणि महाविकास आघाडीच्या नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने कुडाळ प्रांताधिकारी कार्यालयात उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत आणि युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांनी केले आहे.