बेकायदा गोवा बनावटीची दारू आंबोली तपासणी नाक्यावर जप्त

सावंतवाडी
आंबोली तपासणी नाक्यावर बेकायदा गोवा बनावटीची दारू पकडण्यात आली आहे. या प्रकरणी गुजरात येथील चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. संबंधित वाहन गोवा ते गुजरात असे नेले जात होते. यावेळी गाडीची तपासणी करताना पत्र्याचा बंद कप्पा संशयास्पद वाटल्याने तो कापून तपासण्यात आला. यावेळी त्यात गोवा बनावटीची ६ लाख ३३ हजार ६०० रुपयाची दारू आढळून आली. याप्रकरणी पोलिसांनी शैलेश कुमार रामाभाई बारिया (रा. जिल्हा पंचमहाल, गुजरात) या चालकाला ताब्यात घेतले असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी जप्त केलेल्या दारूसह १० लाख रुपये किमतीचे वाहन असा एकूण १६ लाख ३३ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई आंबोली दूरक्षेत्राचे पोलीस हवालदार रामदास जाधव, पोलीस नाईक मनीष शिंदे, होमगार्ड आनंद बरागडे व चंद्रकांत जंगले यांच्या पथकाने केली.