रक्षाबंधन : धाग्यात गुंफलेले संस्कृतीचे बंध

रक्षाबंधन : धाग्यात गुंफलेले संस्कृतीचे बंध

       राखी पौर्णिमेचा सण आला की बाजारात रंगीबेरंगी राख्यांनी दुकाने सजतात. पण हा केवळ एका धाग्याचा सण नाही. हा आहे विश्वासाचा, प्रेमाचा, आणि आपल्या संस्कृतीच्या सातत्याचा उत्सव. श्रावणातील पौर्णिमेला साजरा होणारा हा सण केवळ बहीण-भावाच्या नात्यापुरता मर्यादित नाही, तर तो भारताच्या सांस्कृतिक आणि धार्मिक मनाचा आरसा आहे.रक्षाबंधनाचा उल्लेख आपल्या पुराणांत आणि इतिहासात खोलवर रुजलेला आहे.
अ) इंद्र आणि इंद्राणीची कथा :भविष्य पुराणात कथा येते की एकदा देव आणि दानवांचे युद्ध सुरू होते. दानवांच्या शक्तीपुढे इंद्राचे पारडे हलके पडू लागले. तेव्हा इंद्राणीने इंद्राच्या मनगटावर एक पवित्र धागा मंत्र म्हणून बांधला, ज्यामुळे इंद्राचा विजय झाला. तोच हा रक्षासूत्र.

ब) द्रौपदी आणि श्रीकृष्ण : महाभारतातली सर्वात हृदयस्पर्शी कथा. शिशुपाल वधाच्या वेळी श्रीकृष्णाच्या बोटाला जखम झाली, तेव्हा द्रौपदीने आपल्या साडीचा पदर फाडून त्यांच्या बोटाला बांधला. त्या धाग्याचे ऋण कृष्णाने वस्त्रहरणाच्या वेळी अनंत साडी पुरवून फेडले. नातं रक्ताचं असावं लागत नाही, भावनेचं असतं हेच यातून दिसतं.

क) यम आणि यमुना :यमाला आपली बहीण यमुनेने राखी बांधली आणि यमाने तिला अमरत्वाचे वरदान दिले. म्हणून आजही भाऊ आपल्या बहिणीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतो.

ड) बळीराजा आणि लक्ष्मी : वामनावतारानंतर बळीराजा पाताळात गेला. तिथे विष्णू त्याचा द्वारपाल झाला. विष्णूला परत आणण्यासाठी लक्ष्मीने बळीराजाला राखी बांधून भाऊ मानले आणि वरदान म्हणून विष्णूला मागून घेतले.इतिहासात राखीने शत्रूलाही भाऊ केले आहे. मेवाडची राणी कर्णावतीने मुघल सम्राट हुमायूला राखी पाठवून बहादुरशहापासून रक्षण मागितले होते. हुमायूने ते बंधन पाळले. चित्रपटात शोभा वाढवणारी गोष्ट नाही, तर हा आपल्या मातीतला संस्कार आहे की संकटाच्या वेळी टाकलेली हाक वाया जात नाही.१९०५ साली बंगालच्या फाळणीनंतर रवींद्रनाथ टागोरांनी हिंदू-मुस्लिम ऐक्यासाठी सर्वांना एकमेकांना राखी बांधायला सांगितले होते. तेव्हा राखी हे केवळ सणाचे प्रतीक न राहता, राष्ट्रीय एकात्मतेचे शस्त्र बनले.राखी हा साहित्यिकांसाठी नेहमीच जिव्हाळ्याचा विषय राहिला आहे. राखी म्हणजे काय? तर ती एका क्षणात बांधली जाते, पण आयुष्यभरासाठी मनात घर करते. बहिणीच्या हातून बांधलेला तो दोन रुपयांचा धागा भावाच्या मनगटावर नाही, तर त्याच्या अहंकारावर बांधलेला असतो. "मी आहे तुझ्यासाठी" हे न बोलता सांगणारे ते मौन आहे.आजच्या काळात या सणाचे स्वरूप बदलले आहे. बहीण नोकरीसाठी परदेशात आहे, भाऊ सीमेवर आहे. अशा वेळी व्हिडिओ कॉलवर राखी बांधली जाते. पण भावना तीच असते. आता तर केवळ बहीण-भाऊच नाही, तर देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांना, वृक्षांना, निसर्गाला देखील राखी बांधली जाते. यालाच म्हणतात संस्कृतीचे उत्क्रांती.आज जेव्हा नाती मोबाईलच्या स्क्रीनपुरती उरली आहेत, तेव्हा रक्षाबंधन आपल्याला पुन्हा माणसात आणते. हा सण आपल्याला शिकवतो की रक्षण म्हणजे फक्त शारीरिक रक्षण नाही, तर बहिणीच्या स्वप्नांचे, तिच्या आत्मसन्मानाचे, तिच्या निर्णयाचे रक्षण करणे.खरे रक्षाबंधन तेव्हाच होईल, जेव्हा भाऊ आपल्या बहिणीला म्हणेल - "तुझ्या प्रत्येक निर्णयात मी तुझ्या पाठीशी आहे."हा धागा कच्चा असतो, पण त्यात बांधलेले प्रेम पक्के असते. या श्रावण पौर्णिमेला हा धागा फक्त मनगटावर नाही, तर मनावर बांधूया.

   हीच तर आपली संस्कृती आहे - जिथे एका धाग्यात अख्खं विश्व सामावतं.