भक्तांच्या अथांग जनसागराने फुलली सोनुर्ली नगरी

भक्तांच्या अथांग जनसागराने फुलली सोनुर्ली नगरी

सावंतवाडी
 

   दक्षिण कोकणचे प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोनुर्ली येथील श्री देवी माऊलीच्या वार्षिक जत्रोत्सवात भक्ती आणि श्रद्धेचा अभूतपूर्व संगम पाहायला मिळाला. बुधवारी रात्री 'आई माऊली उदयों'च्या गगनभेदी जयघोषात हजारो पुरुष व महिला भाविकांनी देवीच्या चरणी लोटांगण घालून आपले नवस फेडले. दोन दिवस चाललेल्या या मंगलमय सोहळ्याची सांगता गुरुवारी पारंपरिक 'तुलाभार' विधीने झाली, ज्यामध्ये भाविकांनी स्वतःच्या वजनाइतके धान्य व इतर वस्तू माऊलीला अर्पण केल्या. या दोन्ही दिवसांच्या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. कोकणातील भाविकांचे सर्वोच्च श्रद्धास्थान असलेल्या या दोन दिवसीय जत्रोत्सवासाठी बुधवारी सकाळपासूनच सोनुर्लीकडे येणारे सर्व मार्ग भक्तांच्या गर्दीने फुलून गेले होते. दिवसभर सुरू असलेली भक्तांची गर्दी रात्री आठ वाजल्यानंतर अथांग जनसागरात रूपांतरित झाली. रात्री ठीक अकरा वाजता ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या नयनरम्य आतषबाजीत देवीची पालखी कुळघरातून मंदिरात दाखल झाली. पालखीचे आगमन होताच दिवसभर सुरू असलेले दर्शन आणि ओटी-केळी अर्पण करण्याचे विधी थांबवून पारंपरिक मुख्य लोटांगण सोहळ्याला प्रारंभ झाला. मंदिराच्या सभामंडपाच्या पायरीपासून सुरू झालेल्या या सोहळ्यात नवसकरी पुरुषांनी जमिनीवरून अंग लोटत, तर महिलांनी उभ्याने चालत संपूर्ण मंदिराला प्रदक्षिणा घालून आपले नवस पूर्ण केले. यंदाही महिला भाविकांची उपस्थिती लक्षणीय होती. यावेळी श्री देवी माऊलीच्या अवसारांनी तरंगकाठीसह भक्तांना दर्शन दिल्याने संपूर्ण वातावरण भक्तीरसात न्हाऊन निघाले. सुमारे अडीच ते तीन तास चाललेली ही भक्तीची परिक्रमा हजारो डोळ्यांनी साठवली. लोटांगण घालणाऱ्या भक्तांच्या मदतीसाठी स्वयंसेवक सज्ज होते, तर गर्दी नियंत्रणासाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. जत्रोत्सवाचा दुसरा दिवस परंपरेनुसार स्थानिक ग्रामस्थ आणि केळीकुळातील भाविकांसाठी राखीव होता. गुरुवारी सकाळपासूनच गावकऱ्यांनी दर्शनासाठी आणि ओटी भरण्यासाठी मंदिरात मोठी गर्दी केली होती. यासोबतच येथील वैशिष्ट्यपूर्ण 'तुलाभार' विधीसाठीही भक्तांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या; संकटांचे निवारण व्हावे या श्रद्धेने भाविकांनी वजनाइतक्या वस्तू देवीचरणी अर्पण केल्या. त्यानंतर देवीच्या अवसारी संचाराकडून विविध व्याधी व पीडांनी ग्रस्त असलेल्या भक्तांचे निवारण करण्यात आले. या संपूर्ण जत्रोत्सवात एसटी महामंडळाने जादा बस फेऱ्यांचे नियोजन केल्यामुळे भाविकांचा प्रवास अत्यंत सुखकर झाला, ज्याबद्दल प्रवाशांनी समाधान व्यक्त केले. तसेच, पोलीस यंत्रणेच्या उत्कृष्ट वाहतूक नियोजनामुळे अपुऱ्या पार्किंगमुळे झालेली किरकोळ वाहतूक कोंडी वगळता संपूर्ण उत्सव कोणत्याही अनुचित प्रकाराविना शांततेत पार पडला. जत्रोत्सवावर पावसाचे सावट असल्याने व्यापारी वर्गात काहीशी चिंतेचे वातावरण होते आणि सायंकाळी पावसाच्या हलक्या सरीही बरसल्या; मात्र त्यानंतर पावसाने उघडीप दिल्याने कोणतेही मोठे विघ्न आले नाही. परिणामी, दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत व्यापाऱ्यांचा व्यवसाय तेजीत राहून मोठी आर्थिक उलाढाल झाली.