माडखोल येथील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश!......आंबा-काजू नुकसान भरपाईसाठी महसूलमंत्र्यांचे तात्काळ कारवाईचे आदेश
सावंतवाडी
आंबा आणि काजू पिकाच्या थकीत नुकसान भरपाईसाठी माडखोल गावातील शेतकऱ्यांनी पुकारलेल्या एकजुटीच्या लढ्याला अखेर यश मिळाले आहे. 28 जुलैला जिल्हाधिकारी कार्यालय ओरोस येथे आमरण उपोषणाचा इशारा दिल्यानंतर आज शेतकऱ्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत आपली भूमिका मांडली.दरम्यान जिल्हा दौऱ्यावर आलेल्या राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची शेतकरी शिष्टमंडळाने भेट घेऊन नुकसानभरपाईचे निवेदन सादर केले. यावर महसूलमंत्र्यांनी आंबा-काजू नुकसान भरपाईबाबत प्रशासनाला तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिले.जिल्हाधिकारी कार्यालयानेही तात्काळ लेखी पत्र देत संपूर्ण प्रकरणाची वस्तुस्थिती तपासून नियमानुसार कारवाई करण्याचे आदेश जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आणि सावंतवाडी तहसीलदार यांना दिले आहेत. प्रशासनाकडून आणि महसूलमंत्र्यांकडून सकारात्मक आश्वासन मिळाल्यानंतर माडखोलच्या शेतकऱ्यांनी आपले आमरण उपोषण तूर्तास मागे घेण्याचा निर्णय घेतला.या भेटीदरम्यान जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे, आमदार डॉ. निलेश राणे आणि जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे उपस्थित होते.या आंदोलनात माडखोल विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन जीजी राऊळ, उपसरपंच भाऊ कोळमेकर, माजी सरपंच राजन राऊळ यांच्यासह बाळू शिरसाट, अनिल परब, संतोष राऊळ, आनंद राऊळ, प्रकाश नाईक, शैलेश राऊळ, हेमंत राऊळ, पांडुरंग राऊळ, बापू राऊळ, आनंद नाईक, विनेश तावडे, स्वप्निल राऊळ, प्रशांत माडखोलकर, जानू तेली, उत्तम सावंत, संतोष तेली, बंटी सावंत, आत्माराम लातये, भरत राऊळ, महेश राऊळ, दिपक राऊळ, बाबल सावंत, योगेश लाड आणि मनोज राऊळ यांच्यासह परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी व ग्रामस्थ सहभागी झाले होते.
konkansamwad 
