शिवशाही परुळे आयोजित भव्य नारळ लढविणे स्पर्धा २०२६
परुळे बाजार
शिवशाही परुळे यांच्या वतीने पारंपरिक खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी भव्य नारळ लढविणे स्पर्धा २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे हे पाचवे पर्व असून गुरुवार, २० ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ठीक ४ वाजता, वराठी मंगल कार्यालय, परुळे बाजार येथे स्पर्धा रंगणार आहे.स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रवेश फी २५० रुपये असून मंडळाकडून प्रत्येक स्पर्धकास ५ नारळ देण्यात येणार आहेत. स्पर्धेतील विजेत्यांसाठी आकर्षक रोख बक्षिसांसह कायमस्वरूपी चषक ठेवण्यात आले आहेत. प्रथम क्रमांकासाठी ७ हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ५ हजार रुपये, तर तृतीय व चतुर्थ क्रमांकासाठी प्रत्येकी १ हजार ५०० रुपये व कायमस्वरूपी चषक देण्यात येणार आहे.स्पर्धा आयोजकांनी ठरवून दिलेल्या नियमांनुसारच स्पर्धा पार पडणार असून पंचांचा निर्णय अंतिम व सर्वांना बंधनकारक राहणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या स्पर्धकास स्पर्धेतून बाद करण्यात येईल. तसेच प्रथम येणाऱ्या १५० स्पर्धकांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.स्पर्धेचे YouTube वर थेट प्रक्षेपण (LIVE) करण्यात येणार असल्याने स्पर्धकांसह रसिकांनाही घरबसल्या या रोमांचक स्पर्धेचा आनंद घेता येणार आहे. कोकणातील पारंपरिक नारळ लढविण्याच्या खेळाला नवी ओळख मिळवून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
konkansamwad 
