सिंधुदुर्गनगरी येथे 'डिझास्टर मॅनेजमेंट किट' वापराबाबतचे प्रशिक्षण संपन्न

सिंधुदुर्गनगरी येथे 'डिझास्टर मॅनेजमेंट किट' वापराबाबतचे प्रशिक्षण संपन्न

 

सिंधुदुर्गनगरी


 

       राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्याकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३२ गावांना 'विलेज डिझास्टर मॅनेजमेंट किट' देण्यात आले होते. सदर गावातील ग्रामसेवक, सरपंच तसेच ग्रामपंचायत कर्मचारी यांच्यासाठी जिल्हा नियोजन समिती सभागृह येथे डिझास्टर मॅनेजमेंट किट कसे वापरावे याचे प्रशिक्षण जिल्हा परिषद सिंधुदुर्ग व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते. हे प्रशिक्षण जिल्हा नियोजन समिती सभागृह, सिंधुदुर्ग येथे पार पडले. अरदन रूट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून सदर किट बाबतचे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण उपस्थितांना देण्यात आले. सदर प्रशिक्षणात चक्रीवादळ, पूर या नैसर्गिक आपत्ती तसेच इतर मानवनिर्मित आपत्तीच्या वेळी सदर कीटमध्ये उपलब्ध असलेल्या वस्तू कशा वापराव्यात याचे सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या प्रशिक्षणात मधमाशांपासून होणाऱ्या हल्ल्यापासून स्वतःचा बचाव कसा करावा, कोणते प्रथमोपचार घेणे गरजेचे आहे यासंदर्भात संपादक शेखर सामंत यांनी त्यांना आलेल्या अनुभवाचे कथन करुन मार्गदर्शन केले. 'विलेज डिझास्टर मॅनेजमेंट किट' देण्यात आलेल्या गावांमध्ये वेताळ बांबर्डे, सरंबळ, शिवापूर, वालावल, कवठी, नेरुर कर्याद नारूर, घोडगे, दुर्गानगर, भरणी, चेंदवण, पावशी, बाव अशी बारा गावे व वेंगुर्ला तालुक्यातील तुळस, पाल, दाभोली, वायंगणी, म्हापण, कोचरा, मोचेमाड, निवती मेढा, केळुस , कालवी, होडावडा, कर्ली, चीपी, रेडी, शिरोडा, नवाबाग, उभादांडा, भोगवे, आरवली, सागरतीर्थ, कोचरा, निवती  इत्यादी गावांचा समावेश आहे.
     सदर प्रशिक्षणासाठी निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विशाल तनपुरे, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, तहसीलदार महसूल श्रीम. चैताली सावंत, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजश्री सामंत, NDRF इन्स्पेक्टर नितीन सोकाशे तसेच जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाचे विस्तार अधिकारी श्री. गिरगावकर व श्री. नानचे उपस्थित होते.