नव्या पिढीच्या हातून उभे राहताहेत पाण्याचे बंधारे; ‘पाणीदार’ चळवळीची सिंधुदुर्गात जोरदार चर्चा!

नव्या पिढीच्या हातून उभे राहताहेत पाण्याचे बंधारे; ‘पाणीदार’ चळवळीची सिंधुदुर्गात जोरदार चर्चा!

वेंगुर्ला


     आगामी काळातील संभाव्य दुष्काळ व पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जलसंवर्धन आणि जलसाठा वाढविण्यासाठी भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी हाती घेतलेल्या ‘पाणीदार’ उपक्रमाला वेंगुर्ला तालुक्यात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.आपल्या वाढदिवसानिमित्त अधिकाधिक वनराई बंधारे उभारण्याचा संकल्प केलेल्या विशाल परब यांनी हा वाढदिवस उत्सव केवळ औपचारिक न ठेवता भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार व पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली जलसंवर्धनाच्या कार्याला समर्पित करण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी दुष्काळात शेतकऱ्यांना पाण्याची कमतरता भासू नये, पावसाचे पाणी अडवून जमिनीत मुरावे आणि भूजल पातळी टिकून राहावी, या उद्देशाने सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील वेंगुर्ला, सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यात वनराई बंधारे उभारण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.याच उपक्रमांतर्गत वेंगुर्ला तालुक्यातील मातोंड-तळेवाडी येथे ग्रामस्थांच्या लोकसहभागातून वनराई बंधारा उभारण्यात आला. विशेष म्हणजे या श्रमदानात महिला व शेतकरी वर्गाने मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. या बंधाऱ्यामुळे परिसरातील पाणीसाठा वाढण्यास व आजूबाजूच्या विहिरींची पाणीपातळी टिकून राहण्यास मदत होणार असून त्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.यावेळी बोलताना विशाल परब म्हणाले, ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेतून आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात लोकसहभागाची एक नवी चळवळ उभी राहत आहे. पालकमंत्री नितेश राणे यांनी मोठे कार्यक्रम न करता गावागावात प्रशासनाच्या सहकार्याने जलसंधारणाची कामे करण्याचे आवाहन केले असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ही केवळ बंधारा उभारण्याची गोष्ट नाही, तर गावागावातून उभी राहणारी मोठी जलचळवळ आहे.एखाद्या बुकेऐवजी सिमेंटची गोणी स्वीकारली किंवा पोस्टर लावण्याऐवजी पाण्याचा साठा निर्माण केला, तर त्याचा फायदा भविष्यातील पिढ्यांना होईल. आजची गरज ओळखून जलसंधारणाकडे वळणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.या उपक्रमाला शेतकरी, महिला आणि ग्रामस्थांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून शेतकऱ्यांच्या अडचणीच्या काळात त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा प्रयत्न होत असल्याच्या भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या.यावेळी सरपंच मयुरी वडाचेकर-पाटकर, भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्न उर्फ बाळू देसाई, नगरसेवक सचिन शेट्ये, मातोंड गावातील पदाधिकारी ताता मेस्त्री, अनिल परब, माजी उपसरपंच आनंद परब, दत्ता धुरी, नंदकिशोर परब, विकास परब, बबीता कोंडूसकर, रवी मातोंडकर, आनंद मातोंडकर, महेश मातोंडकर, रूपक मातोंडकर, सत्यवान परब, प्रवीण गुरव, प्राची गुरव, प्रभावती घाडी, संता परब यांच्यासह महिला क्रांती ग्रामसंघ मातोंडच्या महिला, रवळनाथ शेतकरी गट, मातोंड गावठणवाडी शेतकरी गटातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.