सिंधुदुर्गात सायन्स सेंटर उभारणार - आमदार दीपक केसरकर
वेंगुर्ला
वैज्ञानिक दृष्टिकोन समोर ठेवून आपल्याला आपल्या जीवनात पुढे वाटचाल करायची आहे. जिल्ह्यातील मुलांना वैज्ञानिक माहिती मिळण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सायन्स सेंटर असायला हवे, यासाठी मी प्रयत्न करीन. आपल्याकडे वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी वेगळा निधी असतो, त्यासाठी पालकमंत्री यांच्याशी बोलू. वेंगुर्ले मध्ये हे सेंटर झाले तर नगराध्यक्ष जागा उपलब्ध करून देण्यास तयार आहेत. त्यामुळे हे सेंटर नक्कीच सिंधुदुर्गात होईल, अशी ग्वाही माजी शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी वेंगुर्ले येथे दिली.शिक्षण विभाग, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आणि सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, दि. ३ ऑक्टोबर रोजी 'जिल्हास्तरीय विज्ञान नाट्योत्सव २०२६' चे भव्य आयोजन वेंगुर्ला कॅम्प येथील नाटककार मधुसूदन कालेलकर बहुउद्देशीय सभागृहात करण्यात आले होते. या महोत्सवाचे उद्घाटन आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते झाले.यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल, शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, नगराध्यक्ष दिलीप गिरप, सभापती शंकर घारे, उपसभापती सचिन देसाई, तहसीलदार ओंकार ओतारी, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, जिल्हा परिषद सदस्य सुजाता पडवळ, संजय गावडे, विजय नाईक, उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, भाजप वेंगुर्ले तालुकाध्यक्ष पप्पू परब, शिवसेना तालुकाप्रमुख बाळा दळवी, शहरप्रमुख अजित राऊत, विज्ञान मंडळ अध्यक्ष पांडुरंग काकतकर, शिक्षणाधिकारी सुबोध माने, गटशिक्षणाधिकारी अजय ढाणे, नगरसेवक प्रणव वायंगणकर, प्रीतम सावंत आदींसह अधिकारी, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी दादा साईल म्हणाले, विद्यार्थ्यांनी या नाट्य महोत्सवातून विज्ञानाची वेगवेगळी अंग दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. विज्ञानाचा जीवनावर कसा परिणाम होतो आणि त्याला कसे सामोरे जावे याचे मार्गदर्शन यातून मिळणार आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे पाणी टंचाई रोखण्यासाठी विद्यार्थ्यांनीही आपल्या परीने प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.निधीची तरतूद नसतानाही विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान जागृतीसाठी वेंगुर्ले येथे नाट्य महोत्सव घडवून आणल्याबद्दल सभापती प्रितेश राऊळ यांचे आमदार केसरकर यांनी विशेष कौतुक केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळ अध्यक्ष काकतकर यांनी केले, तर सूत्रसंचालन जाधव मॅडम यांनी व आभार अजय ढाणे यांनी मानले.
konkansamwad 
