तिलारी घाटात टँकरला अपघात

दोडामार्ग
तिलारी घाट उतरताना एका तीव्र वळणावर एक सिमेंट वाहतूक करणारा टँकर अडकला. यामुळे या अरुंद घाटातील संपूर्ण रस्ता अडवला गेला असल्यामुळे सुमारे पाच तासांहून अधिक काळ या घाटातील वाहतूक ठप्प झाली होती. परिणामी एसटीसह इतर वाहने खोळंबल्याने उन्हाळ्याच्या गर्मीत प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. तिलारी घाट तीव्र उतार तसेच यू आकाराच्या वळणाचा आणि अरुंद आहे. परिणामी घाटात लांब व मोठी अवजड वाहने अडकण्याचे प्रकार सातत्याने घडत असतात. यामुळे वाहतूकही पूर्णतः ठप्प होऊन इतरांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. गोव्याला सिमेंट वाहतूक करणारा एक कंटेनर तिलारी घाट उतरत होता. मात्र घाटातील तीव्र उतार व यू आकाराच्या वळणाचा चालकास अंदाज चुकला आणि कंटेनर संरक्षक कठड्याला अडकला. सुदैवानेच कंटनेर खोल दरीत कोसळण्यापासून वाचला. यावेळी चालकाने टँकर मागे घेण्याचा प्रयत्न केला. मात्र चालक अपयशी ठरला. यात कंटेनर रस्त्यावरच आडवा राहिल्याने रस्ता वाहतुकीस बंद झाला. एसटीसह इतर वाहने दुतर्फा अडकून पडली. तब्बल पाच तासांहून अधिक वेळ वाहतूक खोळंबली. यावेळी घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अशा अवजड वाहनांना तिलारी घाटातून वाहतुकीस बंदी घालावी अशी मागणी होत आहे.