'जिल्हा बँकेतील नोकरी म्हणजे सिंधुदुर्गच्या भविष्याची गुंतवणूक'......पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते ७३ कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्रे

'जिल्हा बँकेतील नोकरी म्हणजे सिंधुदुर्गच्या भविष्याची गुंतवणूक'......पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते ७३ कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्रे

सिंधुदुर्गनगरी

 

     जिल्हा बँकेतील नोकरी ही केवळ रोजगाराची संधी नसून ती सिंधुदुर्गच्या भविष्यातील गुंतवणूक आहे. नवनियुक्त कर्मचाऱ्यांनी मिळालेल्या संधीचे सोने करत प्रामाणिकपणे जिल्हावासीयांची सेवा करावी आणि जिल्ह्याच्या विकासात योगदान द्यावे, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सरळसेवा भरतीत निवड झालेल्या 73 लिपिक कर्मचाऱ्यांना सोमवारी सिंधुदुर्गनगरी येथील शरद कृषी भवनात पालकमंत्री राणे यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली.यावेळी बोलताना राणे म्हणाले, "तुम्ही ज्या खुर्चीवर बसणार आहात, ती केवळ नोकरीची खुर्ची नसून जबाबदारीचे पद आहे. नियुक्तीपत्र मिळाल्यापासून तुम्ही बँकेच्या आणि जिल्ह्याच्या भविष्यातील वाटचालीचे 'स्टेकहोल्डर' झाला आहात. त्यामुळे प्रामाणिकपणे काम करून जिल्ह्याच्या विकासात योगदान द्या." ही भरती प्रक्रिया आयबीपीएसच्या माध्यमातून पूर्णपणे पारदर्शकपणे पार पडली असून गुणवत्तेच्या जोरावरच नियुक्ती मिळाली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. बदलत्या काळानुसार एआय व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कार्यक्षमता वाढवावी, अशी अपेक्षा त्यांनी नवनियुक्त कर्मचाऱ्यांकडून व्यक्त केली.या कार्यक्रमाला बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, संचालक दिलीप रावराणे, गणपत देसाई, नीता राणे, व्हिक्टर दांटस, गजानन गावडे, प्रकाश मौर्ये, प्रकाश बोडस, मेघनाथ धुरी, समीर सावंत, रविंद्र मडगावकर आदी उपस्थित होते.