जिवंतपणीच अंतिम संस्काराची बुकिंग?.....दिल्लीत ‘संस्कार सेवा’ स्टार्टअपची आगळीवेगळी कल्पना चर्चेत!
नवी दिल्ली
मृत्यू कधी आणि कसा येईल, याचा कोणीही अंदाज लावू शकत नाही. त्यामुळे अनेकजण आपल्या पश्चात कोणतेही वाद होऊ नयेत म्हणून आधीच मृत्यूपत्र तयार करतात किंवा मालमत्तेची विभागणी करून ठेवतात. मात्र, दिल्लीमध्ये याहूनही एक पाऊल पुढे जात लोक जिवंतपणीच स्वतःच्या अंतिम संस्काराची आगाऊ बुकिंग करू लागल्याची माहिती समोर आली आहे. ऐकायला थोडे वेगळे वाटले, तरी ही वस्तुस्थिती असून ‘संस्कार सेवा’ नावाच्या एका अनोख्या स्टार्टअपमुळे ही संकल्पना प्रत्यक्षात आली आहे. घरातील प्रिय व्यक्तीचे निधन झाल्यानंतर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळतो. अशा कठीण प्रसंगी श्मशानभूमी किंवा घाट, पुरोहित, पूजेचे साहित्य आणि अंत्ययात्रेच्या वाहनांची धावपळ करणे अनेकदा कठीण होते. भावनेच्या भरात अनेक गोष्टी सुचत नाहीत किंवा त्यांचा विसर पडतो. कुटुंबीयांचा हाच मानसिक आणि व्यवस्थापकीय ताण हलका व्हावा, या उद्देशाने ‘संस्कार सेवा’ ही आगाऊ बुकिंग सुविधा सुरू करण्यात आली आहे. आपल्या निधनानंतर घरच्यांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, हीच यामागची मुख्य भूमिका असल्याचे कंपनीचे संचालक विश्व कंदर्प यांनी स्पष्ट केले. कंदर्प यांच्या माहितीनुसार, या आगळ्यावेगळ्या सेवेला नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत ३०० हून अधिक जणांनी यामध्ये नोंदणी केली आहे. यामध्ये अनेक नागरिकांनी तर जिवंतपणीच आपल्या अंतिम संस्काराची तरतूद करून ठेवली आहे. ग्राहकांची सोय आणि आर्थिक क्षमता लक्षात घेऊन स्टार्टअपकडून तीन टप्प्यांत पॅकेजेस तयार करण्यात आले आहेत. यामध्ये २९,९९९ रुपयांचे बेसिक पॅकेज, ६९,९९९ रुपयांचे मध्यम पॅकेज आणि १.४९ लाख रुपयांपर्यंतचे प्रीमियम पॅकेज उपलब्ध आहे. या पॅकेजेसच्या माध्यमातून अंत्यविधीशी संबंधित सर्व लहान-सहान व्यवस्थांची जबाबदारी कंपनीकडून घेतली जाते. यामध्ये पार्थिव नेण्यासाठी शववाहिनी, तिरडी, पुरोहित, पूजा साहित्य आणि फुलांची सजावट यांचा समावेश आहे. इतकेच नव्हे, तर अस्थिसंचय, विसर्जनासाठी नाव आणि घाटाची सोय, तसेच श्राद्ध आणि शांतीपाठासारखे सर्व धार्मिक विधी सन्मानपूर्वक पार पाडण्याची जबाबदारीही या स्टार्टअपमार्फत निभावली जाते. जे ज्येष्ठ नागरिक घरात एकटे राहतात किंवा ज्यांची मुले परदेशात स्थायिक झाल्यामुळे अंत्यविधीसाठी तातडीने भारतात येऊ शकत नाहीत, अशा कुटुंबांसाठी ही सेवा अत्यंत मोठा आधार ठरत आहे. सन्मानपूर्वक निरोप मिळावा आणि सर्व विधी व्यवस्थित पार पडावेत, यासाठी ही योजना उपयुक्त ठरत असल्याचे सांगितले जात आहे.
konkansamwad 
