कोकण संस्थेच्या वतीने माणगाव येथील कर्तृत्ववान महिलांचा गौरव
कुडाळ
कोकण कला व शिक्षण विकास संस्थेच्या माध्यमातून डोंगरदऱ्यात आणि दुर्गम भागात राहून समाजाच्या विकासासाठी अहोरात्र झटणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा विशेष सन्मान सोहळा जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून माणगाव येथे मोठ्या उत्साहात पार पडला.या कार्यक्रमात महिला सरपंच, पोलीस पाटील, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, महिला डॉक्टर, वकील, पोलीस आणि महिला उद्योजिकांसह शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या मातांच्या अतुलनीय कार्याचा गौरव करण्यात आला.ग्रामीण भागातील महिलांचे आरोग्य, मुलांचे पोषण आणि प्राथमिक शिक्षण यामध्ये अंगणवाडी सेविका व आशा वर्कर्स यांचे योगदान मोलाचे आहे. दुर्गम भागात घरोघरी जाऊन आरोग्य सेवा पोहोचवणे, लसीकरण आणि कुपोषणमुक्तीसाठी या महिलांनी केलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार यावेळी मान्यवरांनी काढले. समाजाच्या आणि देशाच्या सर्वांगीण विकासात महिलांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असून, त्यांच्या परिश्रमामुळेच ग्रामीण भागातील जीवनमानात सकारात्मक बदल होत असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.या सोहळ्याला माणगावच्या सरपंच मनिषा भोसले, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. मेधा फणसळकर, पोलीस अधिकारी शर्मिला पाडगावकर, प्रभाग संघ व्यवस्थापक साक्षी मेस्त्री, शिक्षिका त्रिवेणी थिटे, देविका भोसले, पोलीस पाटील अदिती देसाई आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी डॉ. मेधा फणसळकर, त्रिवेणी थिटे व देविका भोसले यांनी उपस्थित महिलांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले. आपल्या कार्याची दखल घेऊन सन्मान केल्याबद्दल सर्व महिलांनी कोकण संस्थेचे आभार मानले.या कार्यक्रमासाठी माणगाव ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील सुमारे ११५ महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभागीय व्यवस्थापक प्रथमेश सावंत यांनी केले, तर सूत्रसंचालन समीर शिर्के यांनी केले. सत्यवान भगत यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कोकण संस्थेचे कार्यकर्ते गौरी आडेलकर, अवंती धुरी, शशिकांत कासले, अमोल गुराम, चेतन धरणे, रुचा पेडणेकर, वैष्णवी म्हाडगुत, तन्वी केसरकर, शुभम लोणाग्रे आणि हर्षदा कोरगावकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

konkansamwad 
